
एआयच्या माध्यमातून रोज २० हजार लोकांना कॉल; 'उडान एआय कॉलिंग' सुरू; पहिलाच प्रयोग
बुधवारी (ता. ३०) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या उडान एआय कॉलिंग या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. तसेच शुभारंभानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उडान एआय कॉलिंगबाबत सकारात्मकतेने घ्या, असे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना आवाहन करून जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सुरुवातीला शिक्षण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, आरोग्य आणि पुरवठा विभागासाठी ही सेवा सुरू केली जात आहे. या विभागांच्या सेवांचा थेट आणि मोठ्या प्रमाणात जनतेशी संबंध असल्याने आधी यांची निवड केली आहे. त्यानंतर अन्य विभागांसाठी ही सेवा सुरू होईल. पुढील वर्षभर रोज ५ हजार लोकांशी ''एआय''च्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाईल.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, मार्केटिक्स प्रा. लि. चे मोहित कोकीळ उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिरकले यांनी प्रास्ताविक केले. शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी आभार मानले.
एआयमध्ये बदल, अद्ययावतीकरणही एआयद्वारे नागरिकांशी संवाद प्रक्रिया व प्रश्नांच्या निश्चितीसाठी चार महिन्यांचा कालावधी लागला आहे. अधिकाधिक संवादाने ए आयच्या आवाज अन् बोलण्याच्या पद्धतीत बदल होईल. त्यासोबतच त्याचे अद्ययावतीकरणही होईल. जेथे जास्त तक्रारी असतील तेथे कॉलिंग वाढवून तथ्य जाणून घेतले जाईल. तसेच कन्नड भाषेतूनही संवादाची तयारी केली आहे. समोरच्या नागरिकाने कन्नड भाषेतून संवाद साधल्यास ए आय तसा बदल करेल. तेलुगुतूनही ते सुरू केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
वेळेत कार्यवाहीने वाढेल लोकांचा विश्वास
दर आठवड्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर महिन्याला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला जाईल. ए आयकडून तक्रारी अधिकाऱ्यांच्या डॅशबोर्डला उपलब्ध होतील. जेथे जास्त तक्रारी आहेत तेथे काय कार्यवाही झाली पाहा. विस्तार अधिकाऱ्यांनी तक्रारदारांच्या उपस्थितीत सुनावणी घेऊन कार्यवाही करा. तक्रारीवर वेळेत कार्यवाही झाल्यास निश्चितच लोकांचा विश्वास वाढेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले.