
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी ८८.५२ टक्के मतदान
बारामती:- माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. अ वर्गातील १९५४९ सभासदांपैकी १७२९६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. तर ब वर्गातील १०२ मतदारांपैकी १०१ मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. या निवडणुकीसाठी एकूण ८८.५२ टक्के इतके मतदान झाले आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या ९० उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: सहभाग घेतल्यामुळे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. स्वत: अजितदादांनी आपण पाच वर्षात कारखान्याचा कायापालट करून दाखवण्यासाठीच या निवडणुकीत सहभाग घेतल्याचं सांगत राज्यातील सर्वाधिक दर पाच वर्षात देणार असल्याचं जाहीर केलं.
तर विरोधकांकडून अजितदादा स्वत:च्या खासगी कारखान्यांसाठी माळेगाव ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करण्यात आला. या निवडणुकीत मुख्य लढत निळकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्येच झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार गटाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलनेही या निवडणुकीत ऐनवेळी उडी घेतली. त्यामुळे याही निवडणुकीत पवार-विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला.
आज सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दिवसभरात अ वर्गातील १९५४९ पैकी १७२९६ मतदारांनी आपला मताचा हक्क बजावला. तर ब वर्गातील १०२ पैकी १०१ मतदारांनी मतदान केले. एकूण आकडेवारी पाहता ८८.५२ टक्के इतके मतदान या निवडणुकीत झाले आहे. आजवरच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून सभासदांचा कौल कुणाला मिळणार हे मंगळवारी दि. २४ जून रोजी निकालादिवशीच स्पष्ट होणार आहे.