माळेगाव कारखान्यावर एकहाती सत्ता मिळवून दिल्याबद्दल माळेगावमध्ये आज अजितदादांचा  आभार मेळावा

माळेगाव कारखान्यावर एकहाती सत्ता मिळवून दिल्याबद्दल माळेगावमध्ये आज अजितदादांचा आभार मेळावा

 

बारामती:- माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देत विरोधकांचा सुफडासाफ केला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार दि. २८ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आभार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात अजितदादा कारखान्याच्या प्रगतीबद्दल आणि विरोधकांवर काय बोलतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलला एकतर्फी विजय मिळाला आहे. २१ पैकी २० जागांवर निळकंठेश्वर पॅनलने विजय मिळवत विरोधकांना नामोहरम केले. या पार्श्वभूमीवर शनिवार दि. २८ जून रोजी दुपारी १.३० वाजता अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीत माळेगाव कारखान्याच्या कार्यस्थळी शिवतीर्थ मंगल कार्यालयात आभार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

अजितदादांच्या व्यतिरिक्त एकही उमेदवार निवडून येणार नाही असा दावा विरोधकांकडून केला जात होता. तसेच सहकारी साखर कारखानदारी संपवण्यासाठी अजितदादा माळेगावच्यानिवडणुकीत उतरल्याचा आरोप केला गेला. यावर अजितदादांनी जाहीर सभांमधून उत्तर दिलंच. मात्र आपण कारखान्याची सूत्रे घेतल्यानंतर कारखान्याचा कायापालट करून दाखवण्याचा आणि सलग पाच वर्षे राज्यात सर्वाधिक दर देण्याचा शब्दही दिला.

सभासदांनी या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत निळकंठेश्वर पॅनलला भरघोस मतदान करत विरोधकांना चपराक दिली. राज्यात चर्चेची ठरलेली निवडणूक अजितदादांना ऐतिहासिक विजय देणारी ठरली. त्यानंतर आता अजितदादा माळेगावच्या सभासदांचे आभार मानण्यासाठी येत आहेत. उद्या माळेगावमध्ये होणाऱ्या या सभेत अजितदादा माळेगाव कारखान्याच्या प्रगतीबद्दल तर बोलतीलच, मात्र विरोधकांनाही जोरदार प्रत्युत्तर देतील.