
बारामतीकर मराठी अजरामर गीतांचा आस्वाद घेतांना मंत्रमुग्ध
बारामती:- एकाहून एक सरस अजरामर सुरेल मराठी गीते व त्या मागील पार्श्वभूमी ऐकतांना बारामतीकर मंत्रमुग्ध झाले होते.कवि,गीतकार ग.दि. माडगूळकर,सुधीर फडके,मास्टर कृष्णराव,वसंत प्रभू,शांताशेळके, पु.ल.देशपांडे,राम कदम,जगदीश खेबूडकर आदींची मराठीतील अजरामगर गाणी ऐकतांना बारामतीकर त्या काळात जाऊन पोहोचले.
येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व खासदार सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून रसिक बारामतीकरांसाठी प्रतिबिंब अंतर्गत गीत तुझे स्मरताना- शतजन्म शोधताना.....लाईव्ह इन कॉन्सर्ट हा अजरामर मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम शुक्रवारी (दि.२०जून) येथील गदिमा सभागृहात सादर केला गेला.
अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी यांचे निवेदन,देवेंद्र भोमे यांचे संगीत संयोजन शमिका भिडे,जयदीप वैद्य,मुक्ता जोशी, आशुतोष मुंगळे,भूषण मराठे यांनी सादर केलेली एकाहून एक सरस सर्व प्रकारातील मराठी गीते,गदिमा,बाबूजी यांचे किस्से, त्यांचे शब्दांवरील प्रभुत्व याचा अडीच तास बारामतीकरांनी मनमुराद आनंद घेतला.
गीत रामायणातील कांही गीते, गदिमा,बाबुजी यांची गीते,कांही लावण्या,कांही लोकसंगीत,भक्ती गीते,भावगीते असा सुरेल संगम या कार्यक्रमातून साधला गेला. अनेक गीतांना रसिकांनी दिलेली भरभरुन दाद व काही गीतांना रसिकांनी आवर्जून वन्समोअर दिला.
रसिक बारामतीकरांना अभिजात संगीत अनुभवता यावे, नामवंतांची गीते, त्या मागचा इतिहास माहिती व्हावा आणि पुन्हा एकदा नव्याने या गीतांचा आनंद घेता यावा या उद्देशाने बारामतीकरांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली.त्यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास रसिक बारामतीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.