सणसर जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षिका निर्मला मचाले आदर्श शिक्षक पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सन्मानित!

सणसर जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षिका निर्मला मचाले आदर्श शिक्षक पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सन्मानित!

 

बारामती:- सणसर (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका निर्मला रमेश मचाले यांना पुणे जिल्हा परिषदेचा मानाचा समजला जाणाऱ्या जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोरे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासो बनसोडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, सीईओ गजानन पाटील, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने विविध 100 निकषांची तपासणी जिल्हा परिषदेच्या समितीमार्फत करून हा पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये निर्मला मचाले यांनी सणसर येथील प्राथमिक शाळेत उल्लेखनीय कार्य करत मुलांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रज्ञाशोध परीक्षेतील सहभाग, वर्गातील मुलांचा तालुक्यातील गुणवत्ता यादीत झालेला समावेश, मुलांना हसत खेळत शिक्षण देण्याकडे त्यांचा विशेष कल या साऱ्याची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आली.

निर्मला मचाले या मराठी साहित्यात पीएचडी करत आहेत. त्यांचा पीएचडी चा विषय मराठी बालकथा साहित्याचा वाङ्मयीन अभ्यास हा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये बालकथांचे बालकांचे जीवनातील स्थान व बालकथा वाङ्मयीन अभ्यास हे दोन शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. आपल्या 23 वर्षाच्या ज्ञानदानाच्या सेवाकालात कविता लेखन, चारोळी लेखन, साहित्य लेखन हे छंद जोपासले आहेत.

नुकताच त्यांचा नवांकुर हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्या यंदाचा गौरव अभिजात मराठीचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. राज्यस्तरीय कविता गायन स्पर्धेतही त्यांना सहभाग घेण्याची संधी मिळाली. गावच्या प्राथमिक शाळेचा नावलौकिक वाढल्याने सणसर ग्रामस्थ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचेसह व्यवस्थापन समितीने त्यांचे अभिनंदन केले.