फडणवीस यांची मध्यस्थी; तर शरद पवारांची ऑफर; ’माळेगाव’च्या निवडणुकीतील अनेक गुपिते अजित पवारांनी केली उघड

फडणवीस यांची मध्यस्थी; तर शरद पवारांची ऑफर; ’माळेगाव’च्या निवडणुकीतील अनेक गुपिते अजित पवारांनी केली उघड

 


शिवनगर: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती, तर शरद पवार यांच्या पक्षानेही काही जागा मागत तडजोडीचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केला. कारखाना निवडणुकीतील विजयानंतरच्या शनिवारी (दि. 28) माळेगाव कारखाना कार्यस्थळावर झालेल्या आभार मेळाव्यात पवार बोलत होते.

भाजपचे तावरे आणि अजित पवार यांच्या पॅनेलचे प्रत्येकी दहा आणि एक अजित पवार, पहिले अडीच वर्षे तावरे यांना अध्यक्षपद असा प्रस्ताव होता. आपण महायुतीमध्ये आहोत त्यामुळे तुम्हाला थोडे समजून घ्यावे लागेल. तुम्ही मोठ्या पदावर आहात, असे फडणवीसांनी सांगितल्यावर मी गप्प बसलो. या दहा-दहाच्या प्रस्तावासाठी छत्रपतीचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनीही प्रयत्न केले, त्यांनी तर ‘जर ठरल्यानुसार अजित पवार वागले नाहीत, तर मी ‘छत्रपती’चे अध्यक्षपद सोडेन’ असेही सांगितले होते, तरीही ऐकले नाहीत, असा आरोप अजित पवार यांनी तावरे यांच्यावर केला. पवार म्हणाले, शरद पवार यांच्या पक्षाचीही सहा जागांच्या बदल्यात समझोत्याची तयारी होती, परंतु मी दोन जागा आणि एक जागा स्वीकृत संचालक देतो असे सांगितले. पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप माझ्याकडे आले होते, त्यानंतर पुन्हा मी राजवर्धन शिंदे यांच्याकडे निरोप आला अशी विचारणा केली असता तेव्हा मात्र जगताप यांनी हे जमणार नाही, असे सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत ‘माळेगाव’ संचालकांना गाड्या, जेवण, नाश्ता मिळणार नाही. काटकसरीने कारखाना चालवून अधिकचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्हाला या ठिकाणी पूर्णपणे पारदर्शक काम करायचे आहे, सहकार चळवळ टिकली पाहिजे, या मताचा मी आहे. पण, मला नाहक बदनाम केलं जात आहे. बारामती तालुक्यातील सहकारी संस्था पहा चांगल्यारीतीने चालल्या आहेत. कारखान्यात उपपदार्थाच्या माध्यमातून जास्तीचे उत्पादन घेतले जाईल. दुसरीकडे कार्यक्षेत्रातील उसाचे उत्पादन वाढण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे केला जाईल यासाठी सगळ्यांची साथ मला हवी आहे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

स्थानिक नेत्यांमधील हेव्यादाव्यांमुळे मी अध्यक्षपद जाहीर केलं माझ्या पॅनेलमधीलच सहा ते सात लोक अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. अनेकांचे हेवेदावे आहेत. त्यामुळे मला माझेच नावपुढे करावे लागले. मला अध्यक्षच काय तर संचालकही व्हायचे नव्हते. स्थानिक नेत्यांमधील हेवेदाव्यांमुळे बरेच जण अध्यक्षपदाचे नाव जाहीर करू नका म्हणत होते. प्रत्येकाला अध्यक्ष व्हायचे आहे, कोणी ऐकायला तयार नाही. त्यामुळे अध्यक्षपदाचे नाव जाहीर करू नका, असे मला सांगत होते. त्यावर मात्र मी विचार केला, नेते माझ्या बाजूने नाहीत, मी कितीही त्यांना पदे दिली तरी तेवढ्यापुरते असते, दादा दादा करतात. मात्र नेत्यांनी जरी काहीही केले, तरी बारामतीचा सर्वसामान्य माणूस माझ्या पाठीशी आहे, असा विचार करून मी माझ्या नावाची घोषणा केली, असेही अजित पवार यांनी सांगून टाकले.

आता मीच पाच वर्षे अध्यक्ष

कारखान्याचा अध्यक्ष होण्याचे खूळ अजूनही कोणाच्या डोक्यात असेल तर ते काढू टाका, आता माळेगाव कारखान्याच्या भल्यासाठी आणि विरोधकांना मी सहकार मोडणारा नव्हे तर सहकाराचा पुरस्कर्ता असल्याचे दाखवून देण्यासाठी मीच पाच वर्षे चेअरमन राहणार, अशी घोषणाही अजित पवार यांनी या मेळाव्यात केली.

कामगारांना ठणकावले

कारखान्याच्या कोणत्याही कामगाराने मस्टरवर सही करून चकाट्या मारत फिरलेले चालणार नाही, तुम्हाला कारखाना पगार देतो, फिरायचे असेल तर खुशाल राजीनामा द्या आणि फिरा, डोकं दुखत असेल तर घरीच झोपायचं, असा दम अजित पवार यांनी या सभेत कामगारांना दिला.