माळेगाव कारखाना निवडणूक; निळकंठेश्वर पॅनलचे आठपैकी सात उमेदवार आघाडीवर
बारामती:- माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलची सरशी होताना दिसत आहे. मतमोजणी सुरू असलेल्या आठ जागांपैकी सात जागांवर अजितदादांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. माळेगाव गटातून निळकंठेश्वर पॅनलचे तीनही उमेदवार पुढे असून माळेगावचे माजी अध्यक्ष आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलचे नेते रंजनकुमार तावरे हे मात्र पिछाडीवर पडले आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सध्या बारामती येथील प्रशासकीय भवनात सुरू आहे. यामध्ये निळकंठेश्वर पॅनलचे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले, इतर मागास प्रवर्गातून नितीन शेंडे, भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून विलास देवकाते, महिला प्रवर्गातून संगीता कोकरे यांनी आघाडी कायम राखली आहे. तर माळेगाव गटातून बाळासाहेब तावरे, शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरुंगले हे उमेदवार आघाडीवर आहेत. तर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजनकुमार तावरे, संग्राम काटे, रमेश गोफणे हे उमेदवार पिछाडीवर आहेत.
सद्यस्थितीत मोजणी सुरू असलेल्या आठ जागांपैकी सात जागांवर निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे या अवघ्या काही मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे सहकार बचावचे प्रमुख नेते रंजनकुमार तावरे हेही पिछाडीवर आहेत. त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत अजितदादांची सरशी होताना दिसत आहे.
माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूक मतमोजणी प्रक्रिया ( संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिली फेरी )
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग 8316 मोजलेली
गायकवाड बापूराव 3,717 ( सहकार बचाव )
भोसले रतन 4,117 ( निळकंठेश्वर पॅनल )
इतर मागास प्रवर्ग 8,353 एकूण
नाळे रामचंद्र 3,644 ( सहकार बचाव )
शेंडे नितीन 4,120 (निळकंठेश्वर पॅनल)
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग 8,274
देवकाते विलास 4,269 (निळकंठेश्वर पॅनल )
देवकाते सुर्याजी 3,288 ( सहकार बचाव )
महिला राखीव 8,599
कोकरे राजश्री 2,022 ( सहकार बचाव )
कोकरे संगीता 2,161 (निळकंठेश्वर पॅनल )
ज्योती मुलमुले 1,959 (निळकंठेश्वर पॅनल )
गावडे सुमन 1,545 ( सहकार बचाव )