माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर वर्चस्व कसं मिळवलं? अजितदादांनी सांगितलं गुपित, निकालानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर वर्चस्व कसं मिळवलं? अजितदादांनी सांगितलं गुपित, निकालानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

 


बारामती : सभासदांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नीलकंठेश्वर पॅनेलच्या सर्व उमेदवारांना जे मताधिक्य दिले त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. प्रचारादरम्यान जो शब्द दिला होता, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पुढील पाच वर्षात माझ्यासह प्रत्येक जण मनापासून कष्ट करेल. त्याचबरोबर सभासदांच्या विश्वासाला कायम पात्र राहण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री व नीलकंठेश्वर पॅनेलचे प्रमुख अजित पवार यांनी सभासदांचे आभार व्यक्त केले आहेत.

या निवडणुकीनंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कारखाना म्हणून माळेगाव कारखान्याची सातत्याने ओळख राहील, यासाठी आमचा कायमच प्रयत्न असेल. सभासदांना उत्तम भाव देण्यासोबतच या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासह अनावश्यक खर्च कमी करुन भावात वाढ कशी करता येईल याचा प्रयत्न आम्ही एकत्र बसून करु.

त्याचपुढे, सभासदांनी पाच वर्षांसाठी संधी दिली आहे, त्यामुळे माझ्यासह सर्वच नवनिर्वाचित संचालकांची जबाबदारी वाढली आहे, आर्थिक शिस्त लावण्यासह सर्वार्थाने या कारखान्याचा कायापालट कसा होईल याचा प्रयत्न मी व माझे सहकारी करु, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, सभासद या सर्वांनीच जिवाचे रान केले आहे. विजयासाठी दिवसरात्र त्यांनी मेहनत घेतली असून प्रत्येकाच्या अडचणीवेळी वेळेत उभे राहिले आहेत. असे गुपित अजित पवार यांनी सांगितले. तसेच माझ्यासह माझ्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या या प्रयत्नांची जाण असून आम्ही सगळे मिळून या कारखान्याचा कायापालट निश्चित करुन दाखवू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.