मोरगाव रस्त्यावर हायवा-टीपरची दुचाकीला धडक... दोन चिमुकल्यांसह बापाचाही दुर्दैवी मृत्यू

मोरगाव रस्त्यावर हायवा-टीपरची दुचाकीला धडक... दोन चिमुकल्यांसह बापाचाही दुर्दैवी मृत्यू

 

बारामती:- बारामतीत मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला असून वडील आणि दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. डंपरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलं आहे.

बारामतीत अतिशय दुर्दैवी, दुःखद घटना समोर आली आहे. रविवारी, २७ जुलै रोजी मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका डंपरने दुचाकीला धडक दिल्याने वडील आणि त्यांच्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुलींना डंपरच्या धडकेनंतर झालेल्या अपघातात आपला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात शोकळा पसरली आहे.

डंपरच्या चाकाखाली येत बाप-लेकींचा दुर्दैवी मृत्यू

रविवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. भर रस्त्यावर डंपरच्या चाकाखाली दुचाकी येत अपघात झाला. दुचाकी क्रमांक (एम एच १६ सी ए ०२१२) डंपरखाली चिरडली गेली. अपघातात ओंकार आचार्य (सणसर, तालुका इंदापूर, सध्या रा. मोरगाव रोड, बारामती) यांचा जागीच मृत्यू झाला.

ओंकार यांच्या दुचाकीवर त्यांच्या दोन मुली होत्या. मधुरा (वय ४) आणि सई (वय १०) या दोघीही गंभीर जखमी झाल्या. दोघींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं जाणार होतं. पण दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच दोन चिमुकल्यांचाही मृत्यू झाला.

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने बारामतीत हळहळ व्यक्त होत आहे. डंपरला गाडी धडकून दुचाकी चाकाखाली गेल्याने तिघेही चेंगरले गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.