पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक; अजित पवार म्हणाले, “कोणीही चुकीचं काही…”

पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक; अजित पवार म्हणाले, “कोणीही चुकीचं काही…”

 

पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीत रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कथित रेव्ह पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाकलेल्या या छाप्यात कोकेन, गांजा यासह इतर अमली पदार्थही जप्त करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

प्रांजल खेवलकर यांच्यासह या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस योग्य तो तपास करत आहेत. मात्र, कोणीही चुकीचं वागायचं नसतं आणि कोणीही चुकीचं काही करायचं नसतं’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“पुण्यातील रेव्ह पार्टीची जी काही घटना घडली आहे, त्या घटनेचा तपास कायद्याने आणि नियमाने पुण्याचे सीपी करत आहेत. जे त्या ठिकाणी सापडलेले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेत कोणीही चुकीचं वागायचं नसतं आणि कोणीही चुकीचं काही करायचं नसतं”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

प्रांजल खेवलकर यांना कथित रेव्ह पार्टीत सहभाग असल्याबाबत पुण्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर एकनाथ खडसे प्रतिक्रिया देताना म्हणाले, “गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू होतं, त्यावरून असं काहीतरी घडू शकतं याचा अंदाज मला येत होता. पुण्यामध्ये जी घटना घडली, ते मी चॅनेलच्या माध्यमातून पाहिल. माझं त्यांच्याशी (प्रांजल खेवलकर) बोलणं झालेलं नाही. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर पुण्यात घडलेली घटना खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीचे समर्थन कधीही करणार नाही.”

“पोलीस यंत्रणेने खरोखर चांगल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असे होते की, पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही. अशी जनमानसामध्ये प्रतिमा आहे. जर या प्रकरणामध्ये तथ्य असेल तर जावई असो किंवा कुणीही असो त्याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु जर जाणूनबुजून अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही सहन केले जाणार नाही”, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत प्रांजल खेवलकर?

प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी यांनी त्यांचा बालपणीचा मित्र प्रांजल खेवलकर यांच्याशी लग्न केले. खेवलकर आणि खडसे ही दोनही कुटुंब सध्या जळगावातील मुक्ताईनगर इथे राहतात. प्रांजल खेवलकरांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. खेवलकर कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय बांधकाम क्षेत्र, इव्हेंट मॅनेजमेंटचा आहे. तसंच खेवलकर साखर उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातही ते कार्यरत आहेत.