माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड ; उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांना मिळाली संधी

माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड ; उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांना मिळाली संधी

 

बारामती:-   संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलेल्या दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखालील श्री निळकंठेश्वर पॅनेलने सरशी मारली.त्यानंतर आज कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली.त्यामध्ये अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांना संधी देण्यात आली आहे.     माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच अजितदादांनी अध्यक्षपद आपण स्वत:कडेच घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.

      माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखालील श्री निळकंठेश्वर पॅनेल आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजनकाका तावरे यांच्या नेतृत्वातील सहकार बचाव शेतकरी पॅनेलमध्ये लढत झाली. या निवडणुकीमध्ये श्रीनिळकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागी विजय मिळवत कारखान्याची सत्ता अबाधित ठेवली.तर विरोधी पॅनलमधून केवळ चंद्रराव तावरे यांचा एकमेव विजय झाला.माळेगाव कारखान्याच्या प्रचाराचा शुभारंभ करतानाच अजितदादांनी आपण स्वत: कारखान्याचे अध्यक्ष. होणार असल्याचं जाहीर केलं होतं.त्या अनुषंगाने त्यांनी या निवडणुकीत अत्यंत बारकाईने लक्ष देत व्यूहरचना आखली आणि कारखान्यावरील सत्ता कायम राखली.

   आज शनिवार ५ जुलै रोजी माळेगाव कारखान्याचे यशवंत राव चव्हाण सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक निवडीची बैठक पार पडली.त्यामध्ये अध्यक्षपदा साठी अजितदादांचा,तर उपाध्यक्षपदासाठी संगीता बाळासाहेब कोकरे यांचाच अर्ज दाखल करण्यात आला.दोन्हीही पदांसाठी एकेकच अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी जाहीर केले.दरम्यान,अजित दादांची माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या

संचालक पदापासून केली होती. त्यानंतर सातत्याने त्यांचा राज्य मंत्रीमंडळात सहभाग राहीला आहे.माळेगाव कारखान्याची धुराही आतां अजितदादांनी स्वत:कडे घेतली असून पुढील पाच वर्षात कारखान्याचा चेहरा मोहरा बदलून दाखवण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आहे.