बारामतीतील नर्सिंग महाविद्यालयासाठी 55 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता....

बारामतीतील नर्सिंग महाविद्यालयासाठी 55 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता....

 



बारामती - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिनस्त नवीन नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 55 कोटी 29 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

शासनाच्या वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने या संदर्भातील अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे. या निमित्ताने शैक्षणिक हब असलेल्या बारामतीत या पुढील काळात शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थींना शासकीय दरात नर्सिंगचे प्रशिक्षण प्राप्त करता येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बाबत पुढाकार घेत मान्यता मिळवून देण्यापासून ते इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला. या निर्णयामुळे आता या इमारतीचे काम लवकरच सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

येथील एमआयडीसीतील महिला रुग्णालयानजिक असलेल्या जागेमध्ये नर्सिंग महाविद्यालयाची इमारत उभारली जाणार आहे. या निर्णयामुळे नर्सिंग महाविद्यालयाच्या माध्यमातून परिचारिक व परिचारिका होण्याची संधी युवक व युवतींना प्राप्त होणार आहे. कोविडनंतर परिचारिकांचे महत्व अधिक अधोरेखीत झाले होते.

त्या पार्श्वभूमीवर इतर शिक्षणासोबत नर्सिंग महाविद्यालय शासकीय स्तरावर सुरु केले जावे अशी मागणी होती. त्याचा विचार करुन राज्य शासनाने बारामतीत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या उभारणीस मान्यता दिली. आता इमारत उभारणीसाठी निधी मिळणार असल्याने लवकरच नवीन सुसज्ज प्रशस्त जागेत हे महाविद्यालय सुरु होईल.

असे आहे स्वरुप....

• बारावीनंतर चार वर्षांचा बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रम

• केंद्रीय सीईटी परिक्षेद्वारे प्रवेश होणार

• दरवर्षी 100 या प्रमाणे चार वर्षात 400 विद्यार्थी होणार

• 1 ऑगस्ट 2025 पासून पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरु होणार

• इमारत होईपर्यंत वैदयकीय महाविद्यालयात कामकाज होणार

• पाच प्रयोगशाळा महिला रुग्णालयानजिकच्या इमारतीत होणार