माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड होताच अजितदादांचा कामाचा धडाका

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड होताच अजितदादांचा कामाचा धडाका

 

बारामती:- माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आज अजितदादांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. निवडीनंतर अजितदादांनी संचालक मंडळ आणि अधिकारी वर्गाची बैठक घेत कारखान्याच्या कामकाजाबाबत त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. येत्या पाच वर्षात आपल्याला कारखान्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे. त्यामुळे जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने काम करावं, कुणी चुकीचा वागल्यास आपण हयगय करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

माळेगाव कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज निवड करण्यात आली. निवडीनंतर अजितदादांनी संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांची बैठक घेत माळेगाव कारखान्याच्या पुढील पाच वर्षांच्या कामकामाजाबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या संपूर्ण कामकाजाचाही आढावा घेतला. त्याचवेळी पुढील पाच वर्षात माळेगाव कारखान्याची वाटचाल कशी असेल याबद्दलही त्यांनी माहिती दिली.

सभासदांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवत पुढील पाच वर्षात उच्चांकी ऊसदर देण्यावर आपला भर असणार आहे. त्याचवेळी कारखान्याचा चेहरामोहराही आपल्याला बदलायचा असून सहकारी साखर कारखाना आपण कसा चालवतो हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायचे असल्याचे अजितदादांनी यावेळी सांगितले. प्रत्येक संचालक आणि अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागतानाच सभासदांना सन्मानाची वागणूक देण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.

कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असून प्राधान्याने त्यांच्या हिताचा विचार सर्वांनी केला पाहिजे. त्याचवेळी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वांनीच कटीबद्ध राहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादनात वाढ करण्यावर आपला भर असेल. त्याचवेळी कारखान्यातही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच अजितदादांनी आपल्या कामांचा धडाका सुरू केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी कारखान्यात नवनवीन प्रयोग राबवण्याबाबतच्या संकल्पना मांडतानाच कुणीही चुकीचं वागल्यास त्याची हयगय केली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. कामगारांनीही संस्था आपलीच आहे असं समजून प्रामाणिकपणे काम करावं अशाही सूचना त्यांनी केल्या.

दुपारी तीन वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. त्यानंतर अजितदादांनी सलग पाच तास संचालक मंडळ, अधिकारी वर्ग यांच्या बैठका घेत कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अधिकारी वर्गाशीही त्यांनी चर्चा करत माहिती घेतली. येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने सर्व बाबी सुधारून उत्पादन वाढीवर भर दिला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.