धोम धरण ९0% भरले; कृष्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु

धोम धरण ९0% भरले; कृष्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु

 

वाई:- वाईच्या पश्चिम भागात धोम धरणातून आज शनिवारी दि . २६ रोजी कृष्णा नदीच्या पात्रात दोन हजार क्युसेक्स प्रती सेकंद इतक्या वेगाने पाणी सोडण्यात आले. दरम्यान नदी काठाच्या दुतर्फा गावातील ग्रामस्थांनी खबरदारीचा उपाय म्हणून जनावरे धुण्यासाठी अथवा महिलांनी कपडे धुण्यासाठी व स्नान करण्यासाठी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन तहसीलदार सोनाली मेटकरी, मुख्याधिकारी व प्रशासक संजीवनी दळवी, धोमचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी केले.

धोम बलकवडी धरण सद्यस्थितीमध्ये 84.39% टक्के भरलेले आहे. काल रात्रीपासून धरण परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस चालू असल्याने धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरीता नदीपात्रामध्ये सांडव्यावरून सकाळी 8:00 वा.  1127 क्युसेक्स विसर्ग व विद्युत गृहातून 330 क्युसेक्स असा एकूण 1457 क्युसेक्स सोडण्यात आला.

धोम बलकवडी धरणाखालील कृष्णा नदीपात्रा मध्ये पाण्याच्या येव्यानुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात अथवा कमी करण्यात येऊ शकतो, त्यामुळे धोम बलकवडी आणी धोम धरणा खालील कृष्णा नदी काठच्या दुतर्फा गावातील कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.