इचलकरंजीचा झालाय बिहार; एका हातात हत्यारे, दुसऱ्या हातात फटाके वजीर गँगची दहशत

इचलकरंजीचा झालाय बिहार; एका हातात हत्यारे, दुसऱ्या हातात फटाके वजीर गँगची दहशत


इचलकरंजी:- वजीर गँगने गावभागातील जगताप तालीम मंडळ चौकात वाढदिवस साजरा करत धारधार हत्यारांसह राडा घातला. एका हातात हत्यारे आणि दुसऱ्या हातात फटाके धरून दहशत करणाऱ्या टोळक्याला मज्जाव करताच त्यांनी नागरिकांवर हल्ला चढविला. यात टोळक्याने ब्युटी पार्लरवर आणि बाजूच्या घराच्या दरवाजांवर दगडफेक करत हत्याराने तोडफोड केली. लोखंडी एडक्याने महिलेवर जीवघेणा हल्ला करत तिलाही जखमी केले.

याप्रकरणी म्होरक्या सलमान राजू नदाफ (रा. परीट गल्ली), अविनाश पडियार, आरसलान सय्यद, यश भिसे, अंबादास आरसाल या पाच जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील यश व अंबादास या दोघांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य पसार तिघांच्या शोधासाठी पथके पाठवली आहेत. याबाबतची फिर्याद जखमी ब्युटी पार्लर व्यावसायिक पूनम प्रशांत कुलकर्णी (वय ४३) यांनी पोलिसांत दिली. ही घटना मंगळवारी (ता. १५) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री वजीर गँगचा म्होरक्या सलमान नदाफ हा आठ ते दहा जणांबरोबर जगताप तालीम मंडळ चौकात आला. यावेळी दंगा करत धिंगाणा घालत होते. यावेळी समोरच्या जागेत काही युवक फटाके उडवताना सानवी लेडीज ब्युटी पार्लरमधील पूनम कुलकर्णी यांच्या दिशेने फटाक्यांतील एक शॉट आला. त्यांनी युवकांना फटाके लांब उडवण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून सलमान नदाफ त्याचे मित्र अविनाश पडियार, आरसलान सय्यद तसेच यश आणि आंबादास यांनी त्यांच्यावर लोखंडी एडक्याने हल्ला केला. यावेळी त्या ब्युटी पार्लरमध्ये धावून गेल्या. यानंतर टोळक्याने त्यांच्या डोक्यात दगड फेकून मारला आणि लोखंडी एडक्याने हातावर वार केला. यात पूनम कुलकर्णी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यानंतर टोळक्याने ब्युटी पार्लरची तोडफोड केली. यामध्ये दरवाजे, खिडक्या, बोर्डचे नुकसान केले. शेजारील दुकाने व शौचालयाच्या दारावर दगडासह हत्याराने तोडफोड करून नुकसान केले. घटनास्थळी आज दुपारी पंचनामा करताना तणावाचे वातावरण बनले होते. संतप्त नागरिकांनी एकाला वजीर गँगला माहिती देत असल्याच्या संशयातून पोलिसांसमोर चोप देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सलमान नदाफ याच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात ९ आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २ असे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. तसेच अविनाश पडियार याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. यश भिसे हाही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

मध्यरात्री पुन्हा धिंगाणा

जीवघेणा हल्ला आणि दहशत माजवल्यानंतर टोळक्याने पुन्हा मध्यरात्री धिंगाणा घालत दहशत माजवली. मोठमोठ्याने हॉर्न वाजवत गावभागात चौकाचौकांत फटाके उडवले. गुन्हा केल्यानंतर पुन्हा त्याच भागात काही तासांनी दहशत केली.