पंढरपूर हादरलं! 'माय-लेकाचा सपासप वार करुन खून'
गुरुवार, १७ जुलै, २०२५
Edit
पंढरपूर : पंढरपूर शहरात माय-लेकाच्या दुहेरी हत्येचा
धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शहरातील शिंदे - नाईक नगरमध्ये
मंगळवारी (ता.१५) रात्री साडेनऊ वाजणेच्या सुमारास घडली. हत्येचे कारण
अद्याप समजू शकले नसले तरी आर्थिक कारणावरून खून केला असल्याचा पोलिसांना
संशय आहे.
दरम्यान हत्येला २४ तास उलटून गेले तरी मारेकरी अद्याप सापडले नाहीत.
यामध्ये लखन संजय जगताप (वय २६) आणि त्याची आई सुरेखा संजय जगताप (वय ५०)
यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय जगताप यांनी पंढरपूर
शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी संजय जगताप हे भाजी विक्रीचा
व्यवसाय करतात. त्यातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मंगळवारी
रात्री मुलगा संजय आणि पत्नी सुरेखा जगताप हे दोघे घरी होते.
दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून मुलगा लखन आणि पत्नी सुरेखा
यांच्या डोक्यात, पाठीवर आणि शरीराच्या इतर भागावर धारदार शस्त्राने वार
करून त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपींनी घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप
लावून तेथून पळ काढला. फिर्यादी संजय जगताप हे रात्री उशिरा घरी आले असता
हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.
अर्जून भोसले, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव
घेऊन घटनेची माहिती घेतली. घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही आरोपी अजूनही
सापडले नसल्याची माहिती आहे.
खुनाच्या घटनेबाबत तर्कवितर्क
खुनाचे
खरे कारण अद्याप समजू शकले नसले तरी आर्थिक देवाणघेवाणीतून की अन्य
कोणत्या कारणावरून हा खून करण्यात आला? या विषयी तर्कवितर्क लावले जात
आहेत. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केली असून शोध
सुरू आहे. लवकरच आरोपी सापडतील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.