
सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
सांगली:- सांगली जिल्ह्यात 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाला धक्का बसला आहे. आमदार जयंत पाटील यांच्या जवळचे मानले जाणारे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आज मुंबईतील भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी त्यांनी अण्णासाहेब डांगे यांचे स्वागत केले.
"अण्णासाहेब डांगे पुन्हा एकदा परत आपल्या घरी आले आहेत, डांगे यांनी पक्षासाठी प्रचंड काम केले आहे. पक्षातून बाहेर गेल्यानंतर एवढ्या वर्षे मी पाहिले अण्णा दुसऱ्या पक्षात काम करत असताना आपल्या मुळ विचारापासून बाजूला कधी गेले नाहीत. ज्या मुळ विचारावर अण्णा तयार झाले त्यापासून बाजूला गेले नाहीत. त्यांनी त्यावेळी पक्षाला किंवा परिस्थितीला विरोध केला असेल पण त्यांनी कधी विचाराला विरोध केला नाही. त्यांचं मन इकडेच होते. त्यावेळी तिकडे राहणे ही त्यावेळची राजकीय परिस्थिती असेल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जयंत पाटलांना टोला लगावला
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयंत पाटील
यांच्यावर नाव न घेता टीका केली. 'तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे, तो
प्रवेश आमच्या मनात सध्या तरी नाही', असा खोचक टोला मुख्यमंत्री फडणवीस
यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला.
याआधीही डांगे भाजपामध्ये होते
ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय सुरुवात भाजपामधून केली होती. डांगे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, नंतर जनता पक्ष, नंतर भाजप असा राजकीय प्रवास राहिला आहे. पण भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःचा लोकराज्य पक्ष काढला होता. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर पक्षाच्या फुटीनंतर त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहणे पसंत केले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश केला आहे.