‘या’ दिवशी पंतप्रधान मोदी मोडणार नेहरूंचा सर्वात मोठा विक्रम!

‘या’ दिवशी पंतप्रधान मोदी मोडणार नेहरूंचा सर्वात मोठा विक्रम!

 


पंतप्रधान मोदींच्या नावावर आज आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याच्या बाबातीत पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला असून, ते या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षे आणि ६० दिवस सत्तेत पूर्ण केले आहेत. अशाप्रकारे, त्यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा आणखी एक विक्रम मोडला आहे. पंतप्रधान मोदी आता फक्त जवाहरलाल नेहरूंपेक्षा मागे आहेत, ज्यांनी सलग १६ वर्षे आणि २८६ दिवस पंतप्रधानपद भूषवले आहे.

मात्र मोदी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचाही विक्रम मोडीत काढतील, असंच सध्यातरी चित्र आहे. ११ जुलै २०२६ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान पंडीत  जवाहरलाल नेहरूंना या यादीत मागे टाकतील. कारण, नेहरुंच्या नावावर ४ हजार ४२५ दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे, तर आता सध्या मोदींना ४ हजार ०७८ दिवस पंतप्रधान पदावर झाले आहेत. याशिवाय इंदिरा गांधी ४ हजार ०७७ दिवस पंतप्रधान पदावर होत्या, ज्या आता तिसऱ्या क्रमांकावर गेल्या आहेत.  

जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी दोघांनीही चार वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, परंतु फरक इतकाच होता की नेहरू सतत जिंकत राहिले आणि सत्तेत राहिले, तर आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना काही काळासाठी त्यांची सत्ता गमवावी लागली होती.

पंतप्रधान मोदींबद्दल असेही म्हटले जाते की ते सलग दोन कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले गैर-काँग्रेसी नेते आहेत. याआधी अटलबिहारी वाजपेयी देखील भाजप नेते होते परंतु त्यांचा कार्यकाळ फक्त ६ वर्षांचा होता आणि तोही सलग नव्हता. त्यांच्याशिवाय मोरारजी देसाई, चरणसिंग, चंद्रशेखर, गुजराल, एचडी देवगौडा हे देखील काही पंतप्रधान होते ज्यांनी थोड्या काळासाठी सरकार चालवले.