पुण्यातील मोठ्या धरणाच्या पाण्याला हिरवा रंग, लोकांमध्ये भीतीचं वातावरण

पुण्यातील मोठ्या धरणाच्या पाण्याला हिरवा रंग, लोकांमध्ये भीतीचं वातावरण


पुणे:- पुण्यातील भोर येथील भाटघर धरणाभोवती काही ठिकाणी अचानक पाण्याचा हिरवा रंग आल्याने स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी आणि नान्हे गावातील तलावांमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची प्रभावीता आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे.

इतकेच नाही तर नंदुरबारमधील गोमाई नदी पात्रातही रसायने असलेले हिरवे पाणी येत आहे. भाटघर धरण शाखेचे अभियंता गणेश टेंगळे म्हणाले, "मत्स्यव्यवसाय विभागाने धरणात काही ठिकाणी पिंजरे बसवले आहेत. या पिंजऱ्यांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या अन्नात नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते. यामुळे तलावांमध्ये शैवाल वाढण्याची प्रक्रिया वेगवान होते आणि परिणामी पाणी हिरवे दिसते. काही काळानंतर, हा रंग पुन्हा सामान्य होतो."

स्थानिकांनी तलावातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित केल्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नमुने तात्काळ प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाण्यातील दूषित घटक काढून टाकण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.

धरणाच्या पाण्याचा रंग बदलणे ही जैविक प्रक्रिया आहे की रासायनिक प्रक्रिया आहे हे नागरिकांना जाणून घ्यायचे आहे. नंदुरबारमधील गोमाई नदीच्या पात्रात रसायनांनी भरलेले हिरवे पाणी वाहत आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे मोठ्या संख्येने मासे मरत आहेत. हे रसायनयुक्त हिरवे पाणी कुठून येत आहे? याबद्दल कोणालाही माहिती नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून येथे रसायनयुक्त पाणी वाहत आहे.

या पाण्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकरी त्यांच्या पिकांना पाणीही देत नाहीत. नदीपात्रात येणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु प्रशासनाने याकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही.