
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान
एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना तामिळनाडूमधील एका घटनेची आठवण सांगत राधाकृष्णन यांनी भाषावादावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, जेव्हा मी तामिळनाडूमधून खासदार होतो, तेव्हा एकेदिवशी मी काही लोक कुणाला तरी मारहाण करत असल्याचे पाहिले. मी त्यांना त्यांची अडचण विचारली तेव्हा ते हिंदीत बोलत असल्याचे समजले. मग ते लोक तामिळ भाषेत बोलत नव्हते. तसेच तामिळ भाषेत बोलावं यासाठी त्यांना मारहाण करण्यात येत होती, असे मला हॉटेल मालकाने सांगितले.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन पुढे म्हणाले, जर आपण अशाप्रकारे द्वेष पसरवला. तर इथे येऊन कोण गुंतवणूक करणार? अशाने आपण महाराष्ट्राचं दीर्घकालीन नुकसान करत आहोत. मला हिंदी भाषा समजत नाही. माझ्यासाठी हा एक अडथळा आहे. आपण अधिकाधिक भाषा शिकल्या पाहिजेत. तसेच आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात भाषावाद तीव्र झाला असताना राज्यपालांनी केलेलं हे विधान महत्त्वपूर्ण असून, त्यावर आता काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.