‘आनंदाचा शिधा’ यंदा मिळणार नाही; ‘शिवभोजन थाळी’च्या बजेटमध्येही मोठी कपात?
राज्याच्या तिजोरीवर ताण
राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याने सध्याची आर्थिक परिस्थिती डळमळीत असल्याने सरकारला अनेक योजनांमध्ये कपात करावी लागत आहे. त्याचा फटका ‘आनंदाचा शिधा’ योजनेलाही बसला आहे. सणासुदीच्या काळात गरीब व गरजू शिधापत्रिका धारकांना अतिरिक्त धान्य, साखर, तूरडाळ, खाद्यतेल आदी वस्तू ‘आनंदाचा शिधा’ म्हणून दिल्या जात होत्या. मात्र, यंदा ही सुविधा मिळणार नाही.
‘शिवभोजन थाळी’वरही परिणाम
‘शिवभोजन थाळी’साठी यापूर्वी ६० कोटी रुपयांची तरतूद होती, ती आता फक्त २० कोटी रुपयांवर आणण्यात आली आहे. त्यामुळे थाळ्यांची संख्याही वाढणार नाही. बजेट कपात झाल्याने शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अनेक योजनांवर गंडांतर
राज्याच्या आर्थिक अडचणीमुळे केवळ ‘आनंदाचा शिधा’ नव्हे, तर इतरही अनेक सामाजिक योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना दिलासा देणाऱ्या या योजनांमध्ये कपात झाल्याने सामान्य जनतेवर त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ‘आनंदाचा शिधा’ मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात गरजू कुटुंबांना यंदा अतिरिक्त शिध्यापासून वंचित राहावे लागणार आहे.