
बारामतीत दुबार पेरणीचे संकट; शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे, कडधान्यांच्या वाढीवर परिणाम
दुसरीकडे निरा खोर्यातील वीर, भाटघर, निरा देवघर धरणे जवळपास भरण्याच्या मार्गावर आहेत.
बारामती: बारामती तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. जुलै संपूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिरायती भागातील शेती अडचणीत आली आहे. दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. दुसरीकडे निरा खोर्यातील वीर, भाटघर, निरा देवघर धरणे जवळपास भरण्याच्या मार्गावर आहेत.
मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे तुडुंब झालेले ओढे, नाले, विहिरी सध्या कोरड्या पडू लागल्या आहेत. काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकरी कसाबसा सावरला. जूनमध्येही समाधानकारक पाऊस झाला. पावसामुळे बाजरी, सोयाबीन आदी पिकांच्या पेरण्या झाल्या. मात्र, कमी पावसामुळे कडधान्याच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बागायती भागातील शेतकर्यांनी सध्या पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, जिरायती भागातील शेतकर्यांना पावसाची नितांत आवश्यकता आहे. खरीप पेरण्यात बारामती उपविभाग अव्वल आहे, मात्र जिरायती भागात पावसाचा अभाव असल्याने शेतकर्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
ऐन पावसाळ्यात उकाडा वाढला आहे. चार दिवसांपूर्वी तालुक्यात श्रावण सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पावसाच्या कमतरतेमुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मे आणि जून महिन्यात जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या झाल्या होत्या. सततच्या पावसामुळे जमिनींना वाफसाही आला नव्हता. सध्या बागायती भागात मुबलक पाणी असल्याने उसासह खरिपातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे.
पावसामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्न मात्र मार्गी लागला आहे. ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस पडण्याची शेतकर्यांना आशा आहे.