
मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली, मुंबईत मोठ्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
रविवार, २४ ऑगस्ट, २०२५
Edit
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अचानक बैठक बोलावली आहे. या बैठकीमुळे मुंबईत हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत सध्या गणेशोत्सवची लगबग आहे. अशा काळात मनोज जरांगे यांचा लाखो मराठ्यांचा सहभाग असलेला मोर्चा मुंबईत धडकला तर अनेक प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावल्याची माहिती आहे. या बैठकीत अनेक मराठा नेतेही उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी बैठकीचं नियोजन
करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री या
बैठकीला हजर राहणार आहेत. येत्या 27 ऑगस्टला गणेशोत्सवला सुरुवात होणार
आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे 29 ऑगस्टला सकाळी मुंबईत मोर्चासाठी दाखल
होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई महापालिका, पोलीस प्रशासन यांच्यावर
मोठा ताण येण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला
लाखोंच्या संख्येने येण्याचं आवाहन केलं आहे. पण जरांगे यांच्या मोर्चाच्या
काळात मुंबईत गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे या मोर्चावर तोडगा निघतो का?
यासाठी सरकारची चाचपणी सुरु आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष
असणार आहे.
बैठकीत काय तोडगा निघणार?
मनोज
जरांगे यांनी याआधीदेखील अनेकदा उपोषण केलं आहे. तसेच त्यांनी याआधीदेखील
लाखो मराठ्यांसोबत मुंबईच्या दिशेला मोर्चा आणला होता. त्यावेळी तत्कालीन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे आलेल्या मराठ्यांच्या मोर्चाला
भेट दिली होती. एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथे भेट
घेत त्यांची मनधरणी केली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी काही आश्वासनं
दिली होती. तशाच प्रकारे यावेळीदेखील मनोज जरांगे यांना काही आश्वासने
देण्याबाबत बैठकीत निर्णय होऊन यावर तोडगा निघतो का? ते पाहणं आता
महत्त्वाचं आहे.