पहिल्यांदा नगरपालिका-नगरपरिषदांची निवडणूक! महापालिका, झेडपीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात; हरकती मागवून अंतिम होणार मतदार याद्या, राज्यात ९.८० कोटी मतदार

पहिल्यांदा नगरपालिका-नगरपरिषदांची निवडणूक! महापालिका, झेडपीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात; हरकती मागवून अंतिम होणार मतदार याद्या, राज्यात ९.८० कोटी मतदार

 

सोलापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात निवडणुका होणार आहेत. त्यात राज्यातील ३२ जिल्हा परिषदा, २९ महापालिकांसह ३३१ पंचायत समित्या व २८९ नगरपालिका, नगरपरिषदांचा समावेश आहे.

नगरपालिका, नगरपरिषदांची मतदार यादी लवकर अंतिम होणार असल्याने त्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर मार्च २०२२ पासून प्रशासक आहेत. आता आरक्षणासह गट, गण, वॉर्ड, प्रभागाची रचना देखील बदलून निवडणूका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका आगामी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी घेण्याची संपूर्ण तयारी केली आहे. या निवडणुकांसाठी राज्यातील जवळपास नऊ कोटी ८० लाख मतदार आहेत. १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकत्रित निवडणुका घेण्याएवढे मनुष्यबळ व मतदान यंत्रे नसल्याने दोन टप्पे करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक होईल. सर्वांचे निकाल मात्र एकाचवेळी जाहीर करण्याचे नियोजन असल्याचे, विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

मतदार याद्या, आरक्षण, निवडणूक असे टप्पे असणार

प्रभागरचना अंतिम झाल्यावर जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्यांचे मतदारसंघनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होतील. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय याद्या तयार केल्या जातील. तत्पूर्वी, आरक्षण जाहीर होईल. ज्यांची मतदार यादी लवकर पूर्ण होईल, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होतील.

- सुरेश काकाणी, सचिव, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग

पडताळणीनंतरच मतदार याद्या होणार अंतिम

सध्या देशभरात मतदार याद्यांवरून सुरू असलेला वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदार यादी आक्षेप, हरकती मागवूनच अंतिम करण्याचा सावध पवित्रा आयोगाने घेतला आहे. सुरवातीला मतदारसंघनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यावरील हरकती, आक्षेप मागवून त्यात दुरूस्ती करून मतदार याद्या अंतिम केल्या जातील. त्यानंतर मतदार केंद्रनिहाय (बूथ, वॉर्ड, गट, गण) मतदार याद्या तयार होतील. तत्पूर्वी, मतदार यादीत नाव नाही, दुबार नोंदणी झाली आहे, मयत मतदारांची नावे यादीत आहेत, असे आक्षेप नोंदवता येणार आहेत. मुदतीनंतर कोणाचीही हरकत ग्राह्य मानली जाणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

आता होणाऱ्या आगामी निवडणुका

  • जिल्हा परिषदा : ३२

  • पंचायत समित्या : ३३१

  • नगरपालिका : २४७

  • नगरपंचायती : ४२

  • महापालिका : २९