दौंड तालुक्यात ‘दम मारो दम’

दौंड तालुक्यात ‘दम मारो दम’

 


दौंड शहराच्या विविध ठिकाणी युवक आणि युवतींकडून रात्रीच्या वेळेस खुलेआम नशा करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.

  • शहरात खुलेआम नशेचा सुळसुळाट

  • युवकांसह युवतींचा देखील समावेश

  • पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

दौंड : दौंड शहराच्या विविध ठिकाणी युवक आणि युवतींकडून रात्रीच्या वेळेस खुलेआम नशा करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रकार पोलिसांनी माहिती असूनदेखील कारवाईच्या नावाने केवळ थातुरमातुर हालचाली होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. 

रेल्वे उड्डाणपूल, रेल्वे ग्राउंड, भीमा नदीवरील दशक्रिया विधी घाट, डिझेल पॉइंट एरिया, डिफेन्स कॉलनीजवळचे रस्ते हे या नशेखोरीच्या केंद्रबिंदू असून, रात्री उशिरापर्यंत येथे बिनधास्तपणे दारू, गांजा, व्हाइटनरचे सेवन होत असल्याचे चित्र आहे. काही युवक रस्त्यावर उभे राहून बिअरच्या बाटल्या फोडत असल्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये 25 ते 30 वर्षांचे युवक आणि युवतींचा समावेश आहे. पोलिसांना याबाबत माहिती असूनही त्यांच्याकडून फक्त नावापुरती कारवाई केली जाते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर काही तास ’छापा’ टाकून पुन्हा सर्वकाही माफक पडद्याआड गेलेले दिसते. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही दौंड पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखा या नशेच्या रॅकेटवर कारवाई करणार कधी, असा प्रश्न उपस्थित होतो.

दौंड शहरात इतक्या सहजतेने नशेचे पदार्थ येतात तरी कुठून? यामागे एखादे रॅकेट कार्यरत आहे का? पोलिसांनी आता तरी पाळतीची कारवाई करून या घातक साखळीचा बंदोबस्त करावा, अन्यथा शहरात एखादा दुर्दैवी प्रकार घडल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही, असे आता नागरिकच बोलू लागले आहेत.

पालक हतबल अन् पोलिस गप्प

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही मुली आपल्या पालकांना ’मी आत्महत्या करीन, ब्लेडने हात कापून घेईन’ अशा धमक्याही देत आहेत. त्यामुळे पालकदेखील मूकपणे सर्व सहन करत आहेत. युवक-युवतींच्या व्यसनाधीनतेमुळे केवळ त्यांचेच नाही, तर अनेक घरांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागले आहेत.

नशेचे ठिकाण आणि प्रकार

  • रेल्वे उड्डाणपूल : डिझेल पॉइंट गांजा, दारूचे सेवन, बाटल्या फोडणे

  • दशक्रिया विधी घाट : व्हाइटनरचा वापर, रात्री उशिरापर्यंत नशा

  • डिफेन्स कॉलनीलगतचे रस्ते: युवक-युवतींची गर्दी, दुचाकीवर गोंगाट

  • रेल्वे ग्राउंड परिसर : बिनधास्त नशा, पोलिसांपासून लपण्याचे ठिकाण