खत साठ्यात तफावत आढळल्यास विक्रेत्यांवर कडक कारवाई; कृषी आयुक्त सूरज मांढरे

खत साठ्यात तफावत आढळल्यास विक्रेत्यांवर कडक कारवाई; कृषी आयुक्त सूरज मांढरे

 

  •  कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचा माफदाच्या संयुक्त बैठकीत दिला इशारा

  • पॉस मशीनमधील साठा गोदामातही एकसारखाच असणे आवश्यक

पुणे : राज्यातील कृषी केंद्र चालकांनी त्यांच्याकडील खत विक्रीचा साठा आणि पॉस मशीनमधील साठा हा जुळणे आणि एकसारखाच असणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या तपासणीमध्ये त्यामध्ये तफावत आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी खत विक्रेत्यांच्या संयुक्त बैठकीत सोमवारी (दि.4) दिला आहे. 

येत्या दोन दिवसांत राज्यभर कृषी विभागाकडून खतांची धडक तपासणी मोहिम राबविण्यात येणार असून कोणतीही सबब चालणार नाही. दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत कृषी आयुक्तांनी दिले आहेत.

कृषी आयुक्तालयात कृषी आयुक्त मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र फर्टिलायझर्स-पेस्टीसाईड, सीड डिलर्स असोसिएशनच्या (माफदा) शिष्टमंडळाबरोबर झाली. यावेळी राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) अशोक किरनळ्ळी, कृषीचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, कृषी उपंसचालक (खते) धनंजय कोंढाळकर व अन्य अधिकारी, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, व्यवस्थापक शरद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

राज्यात खत साठा अधिक असताना प्रत्यक्षात खते उपलब्धता का होत नाही? म्हणून लोकप्रतिनिधींमार्फत कृषी विभागाकडे विचारणा केली जात आहे. त्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाने कडक कारवाई करण्याचे संकेत बैठकीत दिले आहेत. खते विक्री झाल्यानंतर पॉस मशीनमधून तेवढा साठा कमी करणे गरजेचे आहे. दुकानात गर्दी आहे, अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने खत विक्री कमी करण्याचे राहून गेले, अशा सबबी यावेळी चालणार नसल्याचे कृषी आयुक्तांनी ठणकावल्याचे कृषी अधिकार्‍यांनी बैठकीनंतर सांगितले.

“राज्यभरात रासायनिक खतांना मोठी मागणी आहे. सध्या रासायनिक खतांचा एकूण 16 लाख 8 हजार मेट्रिक टनाइतका खत साठा उपलब्ध आहे. त्यापैकी 2 लाख 92 हजार मेट्रिक टनाइतका युरियाचा साठा शिल्लक आहे. केंद्र सरकारकडे युरिया व अन्य खतांची मागणी करायची झाल्यास पॉस मशीनमध्ये अधिक साठा दिसत असल्याने राज्याला मंजूर केलेल्या खत पुरवठ्यानुसार नवीन खते मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे अद्ययावत खत साठा नोंद ठेवण्याची जबाबदारी कृषी केंद्र चालकांची आहे. तपासणीत दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

- अशोक किरनळ्ळी , कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), कृषी आयुक्तालय,पुणे.

“राज्यातील सर्व खत विक्रेत्यांनी तातडीने त्यांच्या गोदामात असणारा खत साठा हा पॉस मशीनमधील साठ्यासारखाच आणण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. अन्यथः कृषी केंद्र चालकांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा संयुक्त बैठकीत देण्यात आला आहे. त्यादृष्टिने खबरदारी घ्यावी.

- विनोद तराळ पाटील , अध्यक्ष, माफदा.