
माणिकरावांचं मंत्रिपद वाचवलं अन् भरणेंची नाराजगीही दूर केली... अजितदादांची अजब खेळी
शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५
Edit
बारामती : विधीमंडळाच्या सभागृहात रमीचा डाव खेळल्याने
अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांची विकेट जाणार, असे निश्चित असतानाच
अजित पवारांनी डाव उलटवला. आणि माणिकराव कोकाटे ही मंत्रिमंडळात राहिले, तर
दुसरीकडे दत्तात्रय भरणे कृषिमंत्री झाले. अजित पवारांचे जवळचे विश्वासू
असूनही दत्तात्रय भरणे यांच्या वाट्याला क्रीडासारखे खाते आले होते.
त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते देखील नाराज होते. आता त्यांच्या
कार्यकर्त्यांची ही नाराजी या निमित्ताने दूर झाली आहे.
काल
माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीमंत्री पद काढून घेऊन त्यांना क्रीडा
मंत्रीपद देण्यात आले आणि दत्तात्रय भरणे व कोकाटे यांच्या खात्यांची
अदलाबदल करण्यात आली. अर्थात कृषिमंत्री पद मिळाल्याने दत्तात्रय भरणे
यांच्यासाठी ही लॉटरीच मानली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद गगनात
मावत नव्हता. अचानक दत्तात्रय भरणे हे राज्याच्या चौथ्या स्थानावर आल्याने
त्यांचे कार्यकर्ते खुश झाले आहेत.
काहीही न मिळता व काहीही न करता बारामतीकर भरपूर देतात, असे दत्तात्रय भरणे
काही दिवसांपूर्वी बोलले होते. त्याची प्रचिती त्यांना यानिमित्ताने आली
आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दत्तात्रय भरणे यांच्या राजकीय
कार्यकर्तेच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत त्यांना अनेक पदे अशाच
प्रकारे अचानकपणे मिळालेली आहेत. कोणतीही शक्यता नसताना त्यांच्या वाट्याला
कृषी मंत्रीपद आल्याने ही चर्चा आणखीच वाढली आहे. कारण दत्तात्रय भरणे हे
छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून निवडून गेले. तिथे ते
अध्यक्ष म्हणून निवडले गेले, त्यानंतर जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडले
गेले. तिथेही ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले, जिल्हा परिषदेवर ते सदस्य
म्हणून निवडून गेले. आणि त्याही ठिकाणी ते अध्यक्ष झाले. व ते आता कृषी
मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
दरम्यान मकरंद आबा पाटील यांनाही कृषीखात्याची जबाबदारी सांभाळण्याचा आग्रह
करण्यात आला. पण मकरंद आबांनी यासाठी नकार दिला. त्यानंत अजित पवारांचे
विश्वासू मानले जाणारे दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची धुरा
सोपवण्यात आली. मकरंद आबांनी नकार दिला आणि दत्तात्रय मामांना लॉटरी लागली.