यवत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्या प्रकरणी एकाला अटक

यवत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्या प्रकरणी एकाला अटक

 

दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथील निळकंठेश्वर मंदिरात असलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तोडफोड करून विटंबना केल्या प्रकरणी यवत पोलिसांनी एकाला उसाच्या शेतातून अटक केली. ही माहिती बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अमिन बाबा सय्यद ( रा.यवत रेल्वे स्टेशन,ता.दौंड जि.पुणे )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यवत स्टेशन येथील श्री. निळकंठेश्वर मंदिरात २७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली होती‌‌. या घटनेच्या निषेधार्थ यवत मध्ये पोलीस ठाण्यावर सर्व समाजाच्या वतीने मोर्चा नेऊन आंदोलन ही करण्यात आले होते.

या घटनेचे तीव्र पडसाद दौंड तालुक्यात उमटले. या घटनेचा निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी गुरुवारी (दि ३१) दौंड तालुका बंदची हाक दिली. आरोपीला लवकर अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. यवत पोलिसांनी अमिन सय्यद याला बुधवारी ( दि ३०) रात्री दहा वाजण्याच्या आसपास त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या उसाच्या शेतात लपून बसलेला असताना ताब्यात घेतले.

संबंधित गुन्हेगारावर गंभीर गुन्हे दाखल करुन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती बिरादार यांनी दिली. याप्रसंगी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते. दरम्यान, या घटनेचा निषेधार्थ गुरुवारी दौंड तालुक्यातील यवत, वरवंड, पाटस, दापोडी, चौफुला, बोरीपार्धी यासह अनेक आणि गावांमध्ये कडकडीत बंद पाळला. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळपासून बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी झाले.

संबंधित गुन्हेगाराला तीन दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली असली, तरीही सध्या यवतसह तालुक्यातील काही गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याचे चित्र असुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यवत पोलीसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला गेला आहे. पोलीसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या हिंदू – मुस्लिम या दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र आहे.