
यूपीआय व्यवहारातील नवीन बदल
भारतीय राष्ट्रीय पेमेंटस् महामंडळाने (एनपीसीआय) घेतलेल्या नव्या निर्णयानुसार येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआय व्यवहारांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. यापुढे प्रत्येक यूपीआय व्यवहारानंतर संबंधित युजरला त्याच्या बँक खात्यात उरलेली शिल्लक रक्कम लगेचच स्क्रीनवर दिसणार आहे.
आजवर व्यवहार झाल्यानंतर वेगळ्या अॅपवर जाऊन शिल्लक रक्कम तपासावी लागत होती; पण आता तीच माहिती व्यवहाराच्या शेवटीच दिसणार असल्यामुळे वेळेची बचत होणार आहे.
सध्या एनपीसीआयकडे दररोज कोट्यवधी शिल्लक तपासणीच्या विनंत्या येतात. यामुळे सर्व्हरवर खूप मोठा लोड पडतो. एनपीसीआयने नवे तंत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बँकेच्या सर्व्हरवरील भार कमी होईल आणि वापरकर्त्याला लगेच त्याच्या खात्यात किती पैसे उरले आहेत, हे समजेल. नव्या नियमांनुसार यूपीआय सेवा देणार्या दहा प्रमुख अॅप्ससाठी (जसे की फोनपे, गुगल पे, पेटीएम, भीम अॅप इत्यादी) दररोज फक्त10 वेळा शिल्लक तपासणीची परवानगी असेल. यामुळे अनेकदा विनाकारण खात्याची शिल्लक तपासण्यामुळे निर्माण होणारा अतिरिक्तडेटा लोड कमी होईल. या नव्या तांत्रिक बदलामुळे काही इतर महत्त्वाचे बदलदेखील होत आहेत. उदाहरणार्थ, प्रत्येक यूपीआय व्यवहारासाठी वेगळी एपीआय लिंक तयार केली जाईल आणि तीच वापरून संबंधित बँकेच्या सर्व्हरशी थेट संपर्क साधला जाईल.
काय घडणार?
* यूपीआय व्यवहारानंतर लगेचच शिल्लक रक्कम दिसेल.
* शिल्लक तपासणीवर दररोज दहा वेळेची मर्यादा असेल.
* एपीआय प्रक्रिया अधिक गतीने आणि काटेकोरपणे पार पडेल.
* व्यवहार तपासणीसाठी 30 ते 60 सेकंदांची निश्चित वेळ.
* या प्रणालीमुळे व्यवहारांमधील चुकीचे व्यवहार ओळखणे, आर्थिक फसवणूक टाळणे आणि तक्रारी नोंदवणे, हे सर्व अधिक सुलभ होईल.