
'PAN 2.0' ; आता नवीन कार्ड तयार करावं लागणार का?
खरंतर पॅन कार्ड आता केवळ ओळखपत्र राहिलेले नाही, तर ते एक प्रगत डिजिटल साधन बनलं आहे. सरकारकडून आता पॅन २.० सादर केले गेलं आहे. जे पेपरलेस प्रक्रिया, युनिफाइड पोर्टल आणि डायनॅमिक क्यूआरकोड सारख्या आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. तर पॅन २.० जरी सरकारने आणलं असलं तरी विद्यमान पॅनकार्ड धारकांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण, त्यांचे कार्ड अजूनही पूर्णपणे वैध आहे.
पॅन २.० का सुरू करण्यात आले? -
नोव्हेंबर २०२४ मध्ये अर्थ मंत्रालयाने पॅन २.० सुरू केले. करदात्यांना चांगल्या, जलद आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करण्याच्या यामागे उद्देश होता. हा उपक्रम भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांना अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या अंतर्गत, आता पॅनशी संबंधित सर्व सेवा एकाच युनिफाइड पोर्टलवर उपलब्ध असतील आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि पेपरलेस असणार आहे. २०१७ पासून पॅन कार्डमध्ये क्यूआर कोड देण्यात येत आहे, परंतु पॅन २.० मध्ये हा क्यूआर कोड आता डायनामिक बनला आहे. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही हा क्यूआरकोड स्कॅन करता तेव्हा तो रिअल टाइममध्ये अपडेटेड माहिती दाखवेल. यामुळे कार्डची वैधता तपासणे, ओळख पडताळणे आणि फसवणूक रोखणे सोपे होणार आहे.
जुने पॅन कार्ड धारकांना काही करावे लागेल का? -
सरकारने स्पष्ट केले आहे की जुने पॅन कार्ड देखील पॅन २.० अंतर्गत पूर्णपणे वैध राहतील. २०१७ पूर्वी कार्ड असलेल्या लोकांकडे क्यूआर कोड नाही, परंतु त्यांना हवे असल्यास ते नवीन कार्ड मिळवू शकतात. तथापि, हे अनिवार्य नाही. पॅन २.० सोबत आता मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता, नाव आणि जन्मतारीख यासारखे तपशील आता सहज आणि मोफत अपडेट करता येतील. आधारशी लिंक केल्यामुळे ही प्रक्रिया आधीच सोपी होती, परंतु आता ती अधिक सोयीस्कर करण्यात आली आहे. याशिवाय, एका विशेष QR रीडर अॅपद्वारे QR कोड स्कॅन करून व्यक्तीची पडताळणीही करता येते.
एकाच प्लॅटफॉर्मवरील सर्व सेवा -
PAN 2.0 अंतर्गत सुरू करण्यात आलेले युनिफाइड पोर्टल एकाच वेबसाइटवर PAN आणि TAN शी संबंधित सर्व सेवा प्रदान करेल. यामुळे वापरकर्त्याचा अनुभव सुधारेलच, शिवाय तक्रारींचे जलद निराकरण देखील होईल. प्रक्रिया कागदविरहित असल्याने पारदर्शकता आणि ट्रॅकिंग देखील सोपे होईल.
आयकर कायद्याच्या कलम 272B नुसार, जर एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त PAN धारण केले किंवा चुकीची माहिती दिली तर त्याला १० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. अशा परिस्थितीत, त्या व्यक्तीला त्याच्या संबंधित आयकर कार्यालयात जाऊन अतिरिक्त PAN कार्ड निष्क्रिय करावे लागेल. सरकार या मुद्द्यावरही कठोर पावलं उचलत आहे.