
स्वातंत्र्य दिनाच्या सुरक्षेत गंभीर चूक, डमी बॉम्ब कुणालाच सापडला नाही, 7 पोलीस निलंबित
गेल्या आठवड्यात लाल किल्ल्यावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि सज्जता तपासण्यासाठी एक नियमित सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत, पोलिसांच्याच एका विशेष पथकाला एक बनावट बॉम्ब (डमी बॉम्ब) घेऊन लाल किल्ल्याच्या परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यास सांगण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणा हा बनावट बॉम्ब ओळखू शकते की नाही, हे तपासणे हा यामागील मुख्य उद्देश होता. मात्र, सर्वांना धक्का देत, हे विशेष पथक लाल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा तपासणी सहज पार करून डमी बॉम्बसह आत जाण्यात यशस्वी झाले. तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला हा डमी बॉम्ब ओळखता आला नाही. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "डमी बॉम्ब घेऊन पथकाने सुरक्षा तपासणी यशस्वीपणे पार केली. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेत दिल्ली पोलिसांनी तातडीने ७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची सखोल अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. लाल किल्ल्यासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षेतील ही त्रुटी अत्यंत गंभीर मानली जात असून, चौकशीनंतर सुरक्षा व्यवस्थेत आणखी कडक पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.