
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यासंदर्भात त्यांच्या कुटुंबीयांकडून उपोषण, आंदोलन केले गेले. गुरुवारी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, त्यांची तिन्ही मुले, वडील दत्तात्रय मुंडे, आई चंद्रकला मुंडे, ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
भेटीनंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे
हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे, त्याचबरोबर पोलीस अधिकारी पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचा तपास पथकामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.
कुटुंबीयांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली असून, त्यात पीएसआय संतोष साबळे यांचाही समावेश करण्यात आला आहे.
कोणालाही पाठिशी घालणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबीयांना धीर दिला. या प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यानंतर फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना कॉल केला.
"तुम्हाला जे अधिकारी हवेत ते सर्व दिले जातील. सर्व आरोपींना तात्काळ अटक करा", असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीसही भावूक झाले -ज्ञानेश्वरी मुंडे
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, "महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर गेल्या २१ महिन्यात जे घडले त्या सगळ्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. ते सर्व ऐकून मुख्यमंत्री भावूक झाले. या प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही, असा शब्द दिला. एसआयटी नेमण्याचे आदेश दिले. बीडच्या पोलीस अधीक्षकांनाही मुख्यमंत्र्यांनी कॉल केला आणि कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत."