
"शाब्बास रे पट्ठया! दौंडचा उमेश म्हेत्रे पोहोचला दिल्लीत ; दाखल केला थेट उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज"
दौंड:- भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील सहजपुर गावच्या उमेश म्हेत्रे या तरुणाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नवी दिल्ली मधील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी.मोदी व गिरीमा जैन याच्याकडे उमेदवारी अर्ज आणि 15000 रुपयांचे डिपॉझिट जमा करून अर्ज दाखल केला.
त्याच्या या कृतीने सर्वजण आश्चर्यचकित झाले असून थेट भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर पुढील उपराष्ट्रपती कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेकांची नावे पुढे येत आहेत. एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार असतील. तर, विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
अशातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपुर गावच्या उमेश म्हेत्रे या तरुणाने यात उडी घेतली असून उमेश म्हेत्रे याने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस असताना त्याने नवी दिल्लीतील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेश म्हेत्रे याने यापूर्वीही विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरताना १० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र हे अनिवार्य असल्याने म्हेत्रे ला आमदाराच्या पाठिंब्याचं पत्र न मिळाल्याने त्याचा अर्ज रद्द करण्यात आला होता.