
मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय? अजित पवारांनी दिलं उत्तर; मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत म्हणाले…
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी प्रत्येकाला आंदोलन करण्याता अधिकार असल्याचेही म्हटले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “सरकारने राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी कमेटी स्थापन केली आहे.आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांनी वेळ दिला आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने अधिकार दिला आहे. त्याचा वापर करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. तो फक्त शांततेच्या मार्गाने व्हावा… खरंतर आंदोलनाची वेळ कोणावरही येऊ नये. आंदोलनकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे, त्यामधून कसं मार्ग काढता येईल यासाठी आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्यामधून निश्चित काहीतरी मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे,” असे अजित पवार म्हणाले.
ज्या तयारीने जरांगे आणि मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत, ते सहज परत जातील असं वाटत नाही, याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, “आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. चर्चेतून योग्य काही तो मार्ग निघेल.”
मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांची भूमिका काय? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर, “आपल्या राज्यात जेवढे काही समाज आहेत त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मदत मिळाली पाहिजे. त्यांच्या रास्त मागण्या मान्य झाल्या पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. काही मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षांचे सहकारी त्यांच्यामध्ये सहभागी झाले. त्याबाबत योग्य मागण्याच्या संदर्भात प्रत्येकाला आपलं-आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे,” असे अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची भूमिका
आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाला मनाई नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसले आहेत. आज सकाळी आंदोलक मुंबईत आले. मुंबईत काही ठिकाणी रास्ता रोको करण्याचे प्रकार घडले. मात्र पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलक बाजूला झाले. जरांगे पाटील यांनीही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. शासनाचीही सहकार्याची भूमिका आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन होत असेल तर त्याला कुठलीच मनाई नाही.