
आदिवासींचा एवढा द्वेष का? : रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
आज आदिवासी दिन होता. मात्र राज्याच्या आदिवासी मंत्र्यांनी कुठेही जागतिक आदिवासी समाजाच्या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या नाहीत. भाजपच्या कोणत्याही नेत्याने शुभेच्छा दिल्या नाहीत, कारण भाजपचे तसे आदेशच होते असा आरोप करत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोलेत जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने मिरवणूक निघाली आणि या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केला, हा लाठीमार जाणीवपूर्वक होता असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
जागतिक आदिवासी दिन अकोलेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने आयोजित केला होता आणि त्यासाठी मिरवणूक काढली होती. मात्र गृहमंत्र्यांच्या पोलिसांनी या मिरवणुकीवर लाठीमार केला. हा लाठीमार झाल्याचे स्वतः आमदारांनीच कबूल केले आहे. त्यामुळे हे जाणीवपूर्वक होते का? जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींच्या स्वाभिमानाचा दिवस असताना ही भाजपने तो साजरा केला नाही. ज्यांनी साजरा केला त्यांच्यावर राठीमार केला. आदिवासींचा एवढा द्वेष बरा नव्हे अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
आदिवासी हा या देशाचा मूळ निवासी आहे. आदिवासी एकत्र येऊ नयेत म्हणूनच गृह खात्याने दहा लाठीचार्ज केला. भाजपकडून आदिवासी वेगळे आणि इतर लोक वेगळे असे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नेत्याने शुभेच्छा दिल्या नाहीत. भाजपने आदिवासी समाजाला आता वेगळे नाव दिले आहे. ते आदिवासी म्हणत नाहीत, तर वनवासी म्हणतात. आदिवासी या शब्दाचा अर्थ आधीपासून वास करणारे, निवास करणारे असा असतो, पण वनवासी म्हणजे जे वनात राहणारे असे असतात.
राज्यात एक कोटी आदिवासी समाज आहे. टीआरटी विभागाला मात्र केवळ तीन कोटी रुपये दिले आहेत. राज्यात 35 लाख आदिवासी तरुण आहेत. जी सध्या शिकत आहेत. त्यांना हे पैसे पुरतील का? महायुतीतील नेत्यांना एका कार्यक्रमासाठी 15 -15 कोटी रुपये खर्च करता येतो, पण आदिवासींच्या मुलांना शिक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या संस्थेसाठी केवळ 6 कोटी रुपये दिले आहेत असा देखील आरोप रोहित पवार यांनी केला आहे.