
आदित्य ठाकरे बुरखा घालून भारत-पाकिस्तान सामना पाहणार, नितेश राणेंची आक्षेपार्ह टीका
आशिया कप २०२५ मध्ये उद्या म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० सामना रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाची उत्सुकता पाहायला मिळते. मात्र जम्मू काश्मीर येथील पहलगममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळू नये अशी मागणी राजकीय वर्तुळातून होत आहे.
यादरम्यान राज्यात शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून या सामन्याला विरोध होताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून या समान्याच्या दिवशी सरकारविरोधात आंदोलन केले जाणार आहे. यादरम्यान भाजपाचे नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकार तसेच बीसीसीआयवर टीका केली होती. यानंतर आदित्य ठाकरे हे भारत पाकिस्तान सामना लपून पाहतील असे नितेश राणे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका देखील केली. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, “अरे हेच आदित्य ठाकरे लपून, बुरखा घालून भारत-पाकिस्तान सामना पाहणार आणि त्याचा फायदा असा आहे की आवाजाचीही त्यांना मदत होईल… ‘मै औरत हूं’ (महिलेच्या आवाजाची नक्कल करत)… बुरखा घातला, असा आवाज येईल कोण म्हणेल ते आदित्य ठाकरे आहेत…”, असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवला होता. “ज्या पाकिस्ताननं आपल्या देशावर असंख्य हल्ले केले आहेत. दहशतवाद पसरवला आहे. पहलगाममध्ये ज्या पाकिस्तानने खूप सारे सिंदूर पुसून टाकले, त्या पाकिस्तानशी खेळण्यासाठी बीसीसीआय इतके उत्सुक का झाले आहे? हे पैशांसाठी आहे का? हे चॅनलचा फायदा, जाहिरातींमधून फायदा की खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनासाठी आहे? एकीकडे पाकिस्ताननं हॉकीच्या आशिया चषकावर बहिष्कार टाकला कारण ते सामने भारतात होते, तर मग बीसीसीआय असा बहिष्कार का टाकू शकत नाही?” असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.
तसेच आदित्य ठाकरे यांनी या सामन्यावरून भाजपा गप्प असल्याने त्यांनी विचारसरणी बदलली असल्याची टीका देखील केली होती. खरी भाजपा सत्तेत असती तर हे झालं नसतं, भाजपाने आपली विचारसरणी बदलली आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. तसेच त्यांनी या सामन्यावर बहिष्कार टाकला जाण्याची मागणी देखील केली होती.
उद्धव ठाकरेंचीही टीका
तर उद्धव ठाकरे यांनी देखील आज (शनिवार) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “उद्या भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना आहे. भालाफेकीत आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नीरज चोप्राने पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याला भारतात खेळण्यासाठी आमंत्रित केले होते. हे आमंत्रण त्याने कधी दिले होते, हे माहिती नाही. पण, तो पाकिस्तानी खेळाडू काही आला नाही. यावरून अंधभक्तांनी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणण्यापर्यंत मजल गाठली होती. त्याला यातून किती मनस्ताप झाला असेल, याची मला कल्पनाही करवत नाही. पण, आता अचानक असे काय झाले? ज्या पाकिस्तानबरोबर आपण युद्ध केले, त्यांच्याशी उद्या क्रिकेट सामना खेळणार आहोत.”
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे म्हणजे देशभक्तीची थट्टा आहे. हा देशभक्तीचा व्यापार चालला आहे. यांना व्यापारापुढे देशाचीही किंमत राहिलेली नाही. मला राजनाथ सिंह आणि अमित शहा यांना विचारायचे आहे की, तुम्ही हे युद्ध थांबल्याचे जाहीर केले आहे का? जे नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते आणि लष्करी अधिकारी सोफिया कुरेशी यांना हे अंधभक्त पाकिस्तानची बहीण म्हणाले होते, त्यांचे आता काय करणार? आणि पाकिस्तानबद्दल आपली नेमकी भूमिका काय आहे?”