
भाजपच्या ‘टिफीन’ तर अजित पवारांच्या ‘न्याहारी’ बैठका
पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागताच भाजपने ‘टिफीन बैठका’ घेऊन विचारांचे चर्वण सुरू केले असताना, आता भाजपच्या संगतीत आल्यानंतर पक्षवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही भाजपचे अनुकरण सुरू केले आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी न्याहारी करत संवाद साधण्याऱ्या भाजपच्या ‘टिफीन बैठक’च्या धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने घरोघरी पोहोचण्यासाठी ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ सुरू केले आहे. त्याचा प्रारंभ पुण्यातून करण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादी’ला आणखी बळकटी आणण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. त्यासाठी त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यापासून सुरुवात केली आहे. मतदारांशी संवाद साधण्यासाठी ‘जनसंवाद’ हा उपक्रम सुरू करून नागरिकांचे पक्षविषयक अभिप्राय जाणून घेणे आणि तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यास सुरुवात केली आहे. आता पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांसोबतचे नाते आणखी घट्ट करण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ या उपक्रमाला सुरुवात केली आहे. त्याचा आरंभ पुण्यात हडपसर विधानसभा मतदार संघापासून करण्यात आला आहे.
भाजपने पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद वाढावा, यासाठी ‘टिफीन बैठक’ ही संकल्पना सुरू केली. २०१९ नंतरच्या निवडणुकांपासून या बैठकांवर भाजपने जोर दिला आहे. त्यानुसार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शहर आणि ग्रामीण भागात वस्त्या आणि गावागावांमध्ये जाऊन एकत्र भोजनाचा आस्वाद घेतात. त्यावेळी सरकारच्या कामगिरीचा आढावा, विकास योजनांची माहिती, स्थानिक प्रश्नांवर चर्चा करतात. या बैठकांचा भाजपला फायदा झाला.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपने ‘टिफीन बैठका’ सुरू केल्या आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घरून डबे आणून एकत्र स्नेहभोजन करत पक्षाची ध्येयधोरणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. भाजपने प्रत्येक बुथनिहाय ‘टिफीन बैठका’ घेण्याचे नियोजन सुरू केले आहे.
भाजपच्या संगतीत राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाजपच्या ‘टिफीन बैठक’ची नक्कल केली आहे. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ सुरू केले आहे. त्यानुसार अजित पवार यांनी पुण्यापासून या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन संवाद साधला.
पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन नाश्ता, जेवण करण्याबरोबर रात्री कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. भेळ-मिसळीचे दुकान, डेअरी, हॉटेल, चहाची दुकाने अशा ठिकाणी जाऊन अजित पवार यांनी स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर मिसळीवर ताव मारण्याबरोबरच चहाचा आस्वाद घेतला. ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’च्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एकजुटीने वाटचाल करण्यासाठी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ हा उपक्रम सुरू केला असला, तरी ही भाजपची नक्कल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.