
अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या दमानियांचे पती सरकारच्या थिंक टँकमध्ये, रोहित पवार म्हणाले....
राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या मुद्दे चव्हाट्यावर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारला शाश्वत विकासाबाबत सल्ला देणाऱ्या आणि धोरण ठरवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या ‘महाराष्ट्र इंन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्रा) या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एकीकडे अंजली दमानिया राज्य सरकारमधील विविध कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या घटना उजेडात आणून खळबळ उडवून देत असतानाच त्यांचे पती अनिश यांची सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर वर्णी लागल्यामुळे दमानिया यांच्यावर टीका होत आहे. या टीकेला अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, “माझे पती अनिश यांना यांच्या कर्तृत्वामुळे हे सल्लागार पद देण्यात आलं आहे. सरकारच्या विनंतीवर त्यांनी हे पद स्वीकारलं आहे. मला त्यांचा अभिमान आहे.”
दमानिया कुटुंबाचं आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील कॉम्बिनेशन महत्त्वपूर्ण : रोहित पवार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी म्हटलं आहे की दमानिया कुटुंबाचं आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील कॉम्बिनेशन (संयोजन) महत्त्वपूर्ण राहील.
रोहित पवारांकडून अनिश दमानिया यांचं अभिनंदन
रोहित पवार यांनी म्हटलं आहे की “महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या ‘मित्रा’च्या (MITRA) मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन. एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया या सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. आता अनिशजी यांचे ‘आर्थिक विकासाच्या’ क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातले कॉम्बिनेशन (संयोजन) निश्चितच महत्त्वपूर्ण राहील. पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा!
रोहित पवारांच्या पोस्टवर अंजली दमानिया काय म्हणाल्या?
रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टबद्दल अंजली दमानिया म्हणाल्या, “या ट्वीटबद्दल मला आत्ता काही पत्रकारांचे फोन आले. मी हे ट्वीट वाचलं नव्हतं. रोहित पवारांचे ट्वीट खोचक आहे असे पत्रकार म्हणत होते. पण मी ते ट्विट वाचल्यावर मला तितकसं वाईट वाटलं नाही. हे तर अपेक्षित होतं. अनिश, हा त्याच्या ऑफिसमधील तिसरा असा व्यक्ती आहे, जो FICCI चा सभासद झाला. म्हणून त्याला MITRA वर मानद सल्लागार म्हणून घेतलं आहे. या कामासाठी तो दिड दमडी घेणार नाहीये. त्याला ना राजकारणाशी घेणं देणं, ना सरकारशी. माझ्यासारखं त्यालाही देशाला पुढे नेण्यासाठी आपलं योगदान द्यायचं आहे, तो ते या स्वरूपात देतोय. ही बातमी अनिशने लिंक्डइन व फेसबूकवर स्वतःच शेअर केली आहे. मी देखील माझ्या फेसबूकवर शेयर केली. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही, मला तर त्याचा खूप अभिमान आहे.”
अंजली दमानिया म्हणाल्या, “मी देशासाठी व महाराष्ट्रासाठी काम करते. आता माझे पती देखील देशासाठी व महाराष्ट्रासाठी काम करणार आहेत. त्यांच्याकडे पाच पदव्या आहेत. त्यांच्या कामाचा अनुभव पाहून सरकारने त्यांना हे सल्लागारपद स्वीकारण्याची विनंती केली होती, जी अनिश यांनी स्वीकारली आहे.”