
एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख जाणून घ्या
शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५
Edit
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ सप्टेंबरला
होणारी संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात
पावसामुळे मराठवाडा तसेच इतर भागात झालेले नुकसान आणि हवामानशास्त्र
विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली
आहे. आता ही परीक्षा ९ नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे.
28 सप्टेंबर रोजी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावं पाण्याखाली गेल्याने दळणवळणाला फटका बसला आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे हे आव्हानात्मकच होते. याशिवाय पूरस्थितीमुळे हजारो नागरिकांचा संसार पाण्यात वाहून गेला. अशा कठीण समयी विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अशक्य होते. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी देखील केली होती.
एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला असतानाच अखेर शुक्रवारी दुपारी एमपीएससीने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पत्रक पोस्ट करत परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली.