मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
कर्जमाफी वारंवार करता येत नाही
कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वीच आम्ही सांगितले आहे की, आम्ही आमच्या घोषणापत्रात आश्वासन दिले आहे. त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही करणार आहोत. ती कधी करायची आणि कशी करायची यासंदर्भात एक समिती तयार झालेली आहे. ती समिती अभ्यास करत आहे. कारण कर्जमाफी वारंवार करता येत नाही. त्यामुळे ती करत असताना ती अधिक प्रभावी कशी करता येईल, याचा प्रयत्न आहे. आत्ता आपल्याला कल्पना आहे की, आता खरीपासाठी घेतलेले कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे. आता शेतकऱ्यांना तातडीने त्यांच्या खात्यात मदत जाणे महत्त्वाचे आहे. खात्यातील मदत करणे, हे आमचे प्राधान्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
काही भागात अतिवृष्टीचा अंदाज, सरकारही अलर्ट मोडवर
पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे २७ किंवा २८ सप्टेंबर या दरम्यान मध्य महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या उर्वरित काही भागात अतिवृष्टी होऊ शकते. सरकारही अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी जी काही सतर्कता त्यादृष्टीने घेता येईल, त्यांच्या परिने ती त्यांनी घ्यायला हवी, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान, याव्यक्तिरिक्त पंतप्रधान मोदी यांच्यासमोर महाराष्ट्र डिफेन्स कॉरिडॉर यासंदर्भात प्रेझेंटेशन दिले. यामुळे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला बुस्ट मिळेल. अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकेल. तीन ठिकाणी हा कॉरिडॉर करता येणे शक्य होईल. तसेच गडचिरोलीत मायनिंग डेव्हलपमेंट योग्य पद्धतीने केले, तर त्याचा रोडमॅप कसा तयार असेल, याबाबतही माहिती दिली. देशात सगळ्यात स्वस्त स्टील तयार करू शकतो आणि चीनपेक्षाही त्याचा दर कमी ठेवता येऊ शकेल. तसेच ग्रीन स्टील तयार करण्याच्या संदर्भातही रोडमॅप समोर ठेवलेला आहे. देशाची स्टीलची गरज गडचिरोली भागवू शकेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.