
“मतचोरीचा फक्त आरोप, पण पुरावे…”, राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच पत्रकार परिषदेत या संदर्भातील काही पुरावेही त्यांनी सादर केले.
मतदार यादीतून काही व्यक्तींची नावं वगळण्यासाठी त्यांच्या ओळखीचा वापर दुसऱ्याच व्यक्तींनी केल्याचा दावा करत राज्याबाहेरचे काही मोबाईल क्रमांक ओटीपीसाठी वापरल्याचाही आरोप राहुल गांधींनी केला. दरम्यान, या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया देत काही सवाल विचारले आहेत. ज्या ठिकाणी मतचोरीचा आरोप केला, तेथे काँग्रेसचा उमेदवार निवडून कसा आला? असा सवाल विचारत राहुल गांधी फक्त मतचोरीचा आरोप, पण पुरावे देत नाहीत, असंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
“निवडणूक आयोगाने राहुल गांधी आणि जे आरोप करतात त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते सादर करा. तसेच प्रतिज्ञापत्र सादर करा. मात्र, प्रतिज्ञापत्र न देता फक्त आरोप करत आहेत. मी काही वेळापूर्वी पाहिलं की कर्नाटकमधील एका मतदारसंघामध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, जर मतांची चोरी झाली असती तर त्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार निवडून कसा आला? मग मतांची चोरी कोणी केली? भाजपाने केली की काँग्रेसने केली?”, असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.
“राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे पुरावे दिले नाहीत. फक्त काही आकडेवारी सांगून फेक नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. पण जर राहुल गांधींकडे ठोस पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे दिले पाहिजेत. तसेच त्यांनी न्यायालयात गेलं पाहिजे. पण अशा प्रकारे कोणी सांगून मते कमी किंवा जास्त होत नसतात. जेव्हा काँग्रेस जिंकते तेव्हा त्यांचे आरोप नसतात. मात्र, जेव्हा काँग्रेसचा पराभव होतो तेव्हा ते आरोप करतात. ईव्हीएमवरही राहुल गांधी आरोप करतात. मात्र, ईव्हीएमवरील मतदानाला कधी आणि कोणाच्या काळात सुरूवात झाली?”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
“मी विरोधी पक्षनेता आहे, मी हे सहज बोलत नाहीये. सबळ पुरावा हातात असताना मी हे बोलत आहे. हा पुरावा एकदम स्पष्ट आहे की देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त अशा लोकांना वाचवत आहेत ज्यांनी भारतीय लोकशाही उद्ध्वस्त केली आहे. त्याशिवाय, ज्या पद्धतीने मतं वाढवली जात आहेत किंवा कमी केली जात आहेत हेही मी सांगणार आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात काय घडलं?
राहुल गांधींनी कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात काय घडलं, याचे पुरावे सादर केले. “आलंद हा कर्नाटकमधला एक मतदारसंघ आहे. कुणीतरी तिथल्या ६०१८ मतदारांची नावं यादीतून वगळण्याचा प्रयत्न केला. २०२३ मध्ये तिथे किती मतं रद्द करण्यात आली? हे आपल्याला माहिती नाही. ही मतं वगळताना कुणीतरी रंगेहाथ सापडलं. एका मतदान केंद्रामधल्या अधिकाऱ्याला लक्षात आलं की त्याच्या काकाचं नाव वगळलं गेलंय. त्याने तपास केला असता शेजाऱ्यानं ते मत वगळल्याचं लक्षात आलं. पण शेजारी मात्र म्हणाला की मी असं काहीही केलेलं नाही. कारण एका वेगळ्याच प्रक्रियेतून हे नाव वगळण्यात आलं होतं”, असा दावा राहुल गांधींनी केला.
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मागितली तीन प्रकारची माहिती
पत्रकार परिषदेत वोट चोरीचा आरोप करताना राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे तीन प्रकारच्या माहितीची मागणी केली आहे.
१. मतदारांची नावं वगळण्यासाठीचे अर्ज केले त्या उपकरणांचा आयपी
२. नावं वगळण्यासाठीचे अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांचे पत्ते
३. अर्ज केल्यानंतर आलेले ओटीपी नेमके कुणाकडे गेले याची माहीती
ही सर्व माहिती निवडणूक आयोगाने न दिल्यास ते घोटाळेबाजांना वाचवत असल्याचं सिद्ध होईल, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.