
इंदापूरमध्ये अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे नुकसान; गाळपावर परिणाम होण्याची शक्यता
बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५
Edit
इंदापूर : इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे उसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. उसाचे पीक भुईसपाट झाल्याने गाळपावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
गेल्या चार दिवसांपासून इंदापूर तालुक्यात संततधार असल्याने शेतात पाणी साचले आहे. जमिनीवर आडव्या पडलेल्या कांड्या ओलसर मातीत रुतल्या आहेत. तोडणीस आलेल्या उसाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
साखर कारखान्यांसाठी कच्चा माल म्हणून महत्त्वाचा असलेल्या उसाला पावसाचा तडाखा बसल्याने गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऊस जमिनीवर लोळल्याने त्याला पुन्हा कोंब फुटण्याची शक्यता असल्याने उसात पोकळी निर्माण होऊ शकते. पोकळ उसाचा दर्जा कमी होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.