कांद्याच्या दरात ७० टक्के घट; शेतकरी संकटात
या आठवडाभरात कांद्याचे भाव 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल एवढेच राहिले आहेत. मात्र मागील वर्षी याच काळात कांद्याचा भाव तब्बल 3500 ते 4500 रुपये प्रति क्विंटल होता. या तुलनेत यंदा जवळपास 70 टक्क्यांपर्यंत भाव कोसळले आहेत.
सध्या बाजारात कांद्याला फक्त 10 ते 13 रुपये किलो दर मिळतो आहे. इतक्या भावात खर्च तर दूरच, मजुरीदेखील निघत नाही. साठवलेला कांदा खराब होऊ लागला आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे मिळेल त्या दरात कांदा विकण्याची वेळ आल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शिरूर तालुक्यातील बेट भाग हा कांद्याचे प्रमुख उत्पादन करणारा भाग आहे. चासकमान, मीना शाखा, डिंबा व घोड या कालव्यांमुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. रब्बी हंगामातील पोषक हवामानामुळे चांगले उत्पादन मिळाले असले, तरी वाढलेले मजुरीचे दर, रासायनिक खते, बियाणे व मशागतीचा खर्च शेतकऱ्यांच्या डोक्यावर मोठे ओझे ठरले आहे.
अवकाळी पाऊस आणि खराब हवामानाने यंदा शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. त्यामुळे साठवलेला कांदा जास्त दिवस टिकेल की नाही, याबाबतही शंका निर्माण झाली आहे. पडलेले बाजारभाव आणि खराब होण्याचे वाढलेले प्रमाण या दुहेरी संकटामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले असून त्यांच्या डोळ्यांत पाणी दिसून येत आहे.
स्वप्न धुळीस मिळाली
कांद्याच्या पैशावर बँकांची कर्जे फेडणे, मुलांची शाळेची फी भरणे, लग्न-समारंभाचा खर्च भागवणे, तसेच येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबासाठी नवीन खरेदी करणे, घर बांधणे अशी शेतकऱ्यांची अनेक स्वप्ने होती. मात्र सध्याच्या भावामुळे ही सर्व स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. त्यातच दमट हवामानामुळे साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात विकण्याशिवाय पर्याय उरला नाही.
घटलेल्या दरामुळे नाराजी
महाळुंगे पडवळ : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील खेड आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये कांद्याच्या घटलेल्या दरामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे. राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत प्रति 10 किलो 200 रुपये दराने कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कांद्याची विक्री वाढीव दराने होत असते. मात्र, चालू वर्षी मे, जूनमध्ये 180 ते 200 रुपये किलो, ऑगस्टमध्ये 100 ते 150 रुपये आणि आता सप्टेंबरमध्ये 100 रुपयांपेक्षा कांद्याचे दर घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, उत्पादन खर्च आणि अपेक्षित नफा मिळेनासा झाला नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.
साकोरेचे सरपंच अनिल गाडे म्हणाले, वातावरणातील बदलांमुळे बराकीतील कांदा सडू लागला आहे. बराकीतील कांद्याची निवड करताना मोठ्या प्रमाणात चौरे फुटत आहेत आणि दुय्यम दर्जाचा कांदा बनतो, ज्याला बाजारात केवळ 3 रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. आडतदार सागर थोरात आणि धनेश निघोट यांनी सांगितले, मागणी अत्यंत कमी असून, बाहेरील राज्यांत निर्यात होत नाही, त्यामुळे अपेक्षित बाजारभाव मिळत नाही.