
डोंबिवलीतील गैरवर्तनी भाजप पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांचा इशारा
डोंबिवली – डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी आपल्या बरोबर जे गैरवर्तन केले आहे. हे गैरवर्तन करताना त्यांनी आपल्याशी संभाषण करताना जातीवाचक शब्दांचा वापर केला. त्यामुळे आपल्या जातीचा उल्लेख करून आपल्यासह बहुजन समाजाचा अपमान भाजपच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आपल्या बरोबर गैरवर्तन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने आपण पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहोत, अशी माहिती डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांनी मंगळवारी माध्यमांना दिली.
आपण मागील चाळीस ते पन्नास वर्षापासून काँग्रेसच्या विचारधारेवर चालणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भाजपच्या कुरघोड्यांना आम्ही अजिबात जुमानत नाही. आपल्या बरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, रिक्षा संघटनेचा एक पदाधिकारी आणि इतर दहा ते पंधरा जण यांनी गैरवर्तन केले आहे. ही झुंडशाहीची मनोवृत्ती डोंबिवलीत अजिबात खपवून घेतली जाणार नाही. आपल्या व्यक्ति स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न भाजपच्या गुन्हेगार झुंड टोळीने केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, यासाठी आपण आग्रही असणार आहोत, असे मामा पगारे यांनी माध्यमांना सांगितले.
‘यापूर्वी काँग्रेसची राजवट असताना भाजप कार्यकर्ते काँग्रेस पंतप्रधान, नेत्यांविषयी समाज माध्यमांतून अवमानकारक मजकूर प्रसारित करत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी कधी भाजप कार्यकर्त्यांना घरी, रस्त्यात दटावल्याची प्रकरणे नाहीत. मग आताच भाजप कार्यकर्त्यांना राग का येऊ लागला आहे. आपण डोंबिवलीतील काँग्रेसच्या ७२ वर्षाच्या ज्येष्ठ नेत्याशी गैरवर्तन करत आहोत याचे भान सुसंस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना असणे आवश्यक होते. पण हे कृत्य करणारे पदाधिकारी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून फार काही अपेक्षा नाही. मामा पगारे यांना साडी नेसवून एक प्रकारे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्याचा प्रयत्न भाजप डोंबिवली पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत,’ असे कल्याण जिल्हा काँग्रसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले.
समाज माध्यमांवर मोदींची साडी नेसलेली प्रतिमा प्रसारित झाली होती. ती आपण पुढे पाठवली. त्यानंतर आपणास सोमवारी संदीप माळी यांच्या मोबाईलवरून सुरेश पाटील बोलतो. एका इमारतीचे काम आहे असे बोलून भेटीची वेळ मागितली. आपण त्यांना मंगळवारी सकाळी भेटू सांंगितले, असे पगारे यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी आपण मुलासह डोळे दाखविण्यासाठी नेत्र रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी पुन्हा संदीप माळी यांनी कुठे आहात अशी विचारणा केली. आपण नेत्र रुग्णालयात आहोत, असे सांगितले. तोपर्यंत माळी आणि त्यांचे सहकारी रुग्णालयाच्या बाहेर आले. मी बाहेर पडताच त्यांनी पकडून आपणास साडी नेसवली. आपण त्यांना करत असलेला प्रकार योग्य नसल्याचे सांगितले. आपल्याशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्या शिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा काँग्रेस ज्येष्ठ नेते मामा पगारे यांनी दिला आहे.