भारत-पाकिस्तान सामन्यात नेमकं कोण जिंकलं? राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून सवाल!

भारत-पाकिस्तान सामन्यात नेमकं कोण जिंकलं? राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून सवाल!

 

मुंबई: आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्याची चांगलीच च्चा होत आहे. रविवारी झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. मात्र पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सामन्याला सामजिक आणि राजकीय स्तरातून विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता राज ठाकरे यांनी यावरून भाष्य केल आहे. राज ठाकरेंनी पहलगाम हल्ला आणि भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे.

जम्मू आणि काश्मिर येथील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला होता. यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर भारत आणि पाकिस्तान याच्यातील संबंध चांगलेच ताणले गेले होते. यानंतर देशातील विरोधी पक्षांकडून या क्रिकेट सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी करत बीसीसीआय आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. याबरोबरच नागरिकांना सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन देखील केले गेले. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील या सामन्याच्या आयोजनावर आक्षेप घेतला होता मात्र याचा काहीएक परिणाम झाला नाही. सरकार आणि बीसीसीआय दोन्ही त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. 

राज ठाकरेंचे मार्मिक भाष्य

राज्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाने भारत-पाक सामन्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर आता राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या व्यंगचित्रातून भाष्य केले आहे. त्यांनी भारत पाकिस्तान सामन्यात नेमकं कोण जिंकलं? आणि कोण पराभूत झालं? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच व्यंगचित्रामध्ये आयसीसी आणि गृहमंत्रालय प्रतिकात्मकपणे “मित्रांनो कृपया उठा! आपण जिंकलो, पाकिस्तान हरला!” असे पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृतदेहांना सांगताना दिसत आहेत.

भारत पाक सामन्यावर बीसीसीआयची भूमिका काय?

बीसीसीआयचे सचिव देवजीत साईकिया यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सांगितलं की, ‘केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान सामन्यांसंदर्भात जारी केलेल्या धोरणानुसार सामना आयोजनाचा निर्णय झाला आहे. आशिया चषक ही दोन देशांदरम्यानची स्पर्धा नाही. यामध्ये अनेक संघ सहभागी होतात. भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातला तर देशाचं कॉमनवेल्थ तसंच ऑलिम्पिक आयोजनाचं स्वप्न धोक्यात येऊ शकतं’.हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केले होते.

साईकिया पुढे बोलताना म्हणाले की, ‘आम्ही आशिया चषकात सहभागी होण्याचा निर्णय घेतला कारण या स्पर्धेत अनेक संघ खेळत आहेत. ऑलिम्पिक, फिफा वर्ल्डकप, एएफसी, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा यासारखीच ही स्पर्धा आहे. आपण या स्पर्धेवर किंवा सामन्यावर बहिष्कार टाकू शकत नाही. तसं केल्यास त्याचे परिणाम नकारात्मक होतात. जेव्हा भविष्यात आपल्याला एखादी जागतिक स्तरावरच्या स्पर्धेचं आयोजन करायचं असेल तेव्हा अशी भूमिका अडचणीत टाकू शकते. या स्पर्धेत आपण सहभागी होत आहोत कारण खेळणं, न खेळणं थेट आपल्या हातात नाही. दोन देशांदरम्यानची मालिका असती तर त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट आहे. २०१२-१३ नंतर पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळलेलो नाही’.