“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; उपमुख्यमंत्री अजित पवार
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होतो. शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर एकनाथ शिंदे हेही शिवसेनेचा दसरा मेळावा घेतात. तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे भगवान गडावर दसरा मेळावा घेतात. नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही मेळावा होतो. यासह राज्यातील विविध भागात दसरा मेळावे उत्साहात साजरे केले जातात. परंतु, राज्यातील कठीण परिस्थितीचा विचार करून दसरा मेळावे घेण्यावरून राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दसरा मेळाव्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर उत्तर देताना, मला याबाबत काही बोलायचे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते प्रगल्भ आहेत. ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत. दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन त्यांनी निर्णय घ्यावा, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सर्व मंत्र्यांनी दौरे केले. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते. शेतीचे प्रचंड नुकसान होते. जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. आता तातडीची पाच हजार रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जात आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
दरम्यान, मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे. लोकांचे सगळे उद्ध्वस्त झाले आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले आहेत. उद्धवराव, आता वेळ आहे कृती करायची… मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना दिला पाहिजे. तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल, अशी पोस्ट केशव उपाध्ये यांनी एक्सवर केली. परंतु, याला उत्तर देताना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणारच, असे ठामपणे सांगताना उद्धवसेनेचे नेते महेश सावंत यांनी भाजपावर टीका केली.