दोन कोटींची पेट्रोलची उधारी.. अजित पवार भडकले!

दोन कोटींची पेट्रोलची उधारी.. अजित पवार भडकले!

 

बारामती:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रुद्रावतार धारण केला. एकीकडे वेगवेगळ्या गोष्टींसाठी विकास कामांसाठी दीडशे दीडशे कोटी रुपये मंजूर करून आणतो आणि तुम्ही अशा प्रकारे गैरप्रकार करता? असे म्हणत त्यांनी साऱ्यांचीच हजेरी घेतली. 

 या सभेत त्यांनी बाजार समितीतील गैरप्रकारांवरून व्यवस्थापकावर भडकले आणि कठोर कारवाईचा इशारा दिला. मी आणलेल्या निधीचा गैरवापर होत असेल तर मी पदे काढून घेईल आणि जबाबदार असणाऱ्यांना जेलमध्ये टाकेन असा इशारा देखील अजित पवारांनी दिला. एवढेच नाही तर बाजार समितीच्या आवारात नशा पाणी करून शस्त्र धारण करून दहशत मावजणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. 

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली यावेळी त्यांना माहिती देण्यात आली होती बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरून तब्बल दोन कोटींचे पेट्रोल डिझेल उधारीवर गेले आहे ही माहिती मिळताच अजित पवार भडकले. पेट्रोल डिझेल ची उधारी कशी असू शकते? असा प्रश्न करत त्यांनी व्यवस्थापकाला तुझ्या बापाची मार्केट कमिटी आहे का? ही तुझी आई बापाची नाही आणि माझ्याही बापाची नाही ही हमाल मापाड्यांची आणि शेतकऱ्यांची आहे.

मी इकडे दीडशे दीडशे कोटी रुपये आणतो आणि तुम्ही हा नालायकपणा करता मी तुला जेलमध्ये टाकेन हा! ही उधारी जमा झाली नाही तर तुम्ही भरून टाका आणि ही उधारी वसूल करण्यासाठी तातडीने पावले उचला असे म्हणत असतानाच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निर्देश करून हे काम जरी पोलिसांचे नसले तरी उधारी असणाऱ्यांना फोन करून सूचना द्याव्यात असे स्पष्ट केले. 

बाजार समितीला गेल्या काळात १४९ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, समितीचे वार्षिक उत्पन्न केवळ एक कोटी रुपये आहे, असे सांगत पवार यांनी कामाचा वेग कमी असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यांना दीडशे कोटींचे काम करायला दीडशे वर्षे लागतील का? लाज काही आहे का? असे म्हणत त्यांनी समितीच्या सभापती व व्यवस्थापकांना इशारा दिला की, काम व्यवस्थित करा, अन्यथा मी केस दाखल करायला लावेन. मी हयगय करणार नाही. सभेत एका तक्रारीच्या पत्रावरूनही पवार भडकले.

 पत्रात बाजार समितीतील कथित गैरप्रकारांचा उल्लेख होता. अजित पवार यांनी त्यांच्या स्वीय सहायकांना सांगितले की हे पत्र ठेव. 5 ऑक्टोबर रोजी यांना मुंबईला बोलवा. मी करोडो रुपयांचा निधी आणतो आणि तुम्ही असं करताय? सगळी झाडझडती घेतो असे ते म्हणाले.