
भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्ल्याने विषबाधा; बारामती तालुक्यातील घटना
डोर्लेवाडी : सद्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. या नवरात्री उत्सवाच्या दरम्यान महिला-पुरुष नऊ दिवस उपवास करत असतात. उपसादरम्यान, महिला पुरुष अनेक उपवासाचे पदार्थ घरी आणून खात असतात. यामध्ये भगरिच्या पिठाच्या भाकरी जास्त प्रमाणात खाल्या जातात. याच भगरीच्या पिठाच्या भाकऱ्या खाल्ल्याने बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावातील आठ महिला व पुरुषांना चक्कर, उलट्या, पोटदुखी, असे त्रास चालू झाले आहेत.
भगरीच्या पिठाच्या भाकऱ्या खाल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातील दोन महिलांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना बारामतीतील एमआयडीसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून रुग्णांच्या सर्व प्रकारच्या टेस्ट घेतल्या असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच नेमकं निदान समोर येणार आहे.
रुग्णांनी झारगडवाडी गावातील एका किराणा दुकानातून भगरीचे पीठ आणून भाकरी खाल्ल्यामुळे चक्कर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला असा रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केला. यामुळे या किराणा दुकानावर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी रात्री आठ वाजता धाड टाकली. यामध्ये सर्व भगरीचे पीठ अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यानी तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.
भगरीचे पीठ हे जास्त दिवसाच्या असण्याची शक्यता आहे. यामुळे भगरीचे पीठ व पाणी मिक्स झाल्यानंतर बॅक्टेरिया तयार झाला असल्याचा व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे महिला व पुरुषांना डोकेदुखी उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचा अंदाज आहे. भगरीचे पीठ हे तपासणीसाठी लॅबला पाठवण्यात येणार आहे. सध्या तरी झारगडवाडी गावातील धाड टाकलेल्या किराणा दुकानातून खरेदी केलेल्या भगरीच्या पिठाच्या भाकऱ्या खबरदारी म्हणून महिला व पुरुष नागरिकांनी खाऊ नये, असे आव्हान अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.