
ऐन सणासुदीतच साखर भडकण्याची शक्यता
गतवर्षी 2024 मध्ये 25.25 लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा देण्यात आला होता. यावर्षी 1.25 लाख मेट्रिक टनांनी कोटा कमी केल्यामुळे बाजारातील साखरेची उपलब्धता मर्यादित असेल. साखरेचा दर सध्या पाच टक्के जीएसटी वगळता 3,850 ते 3,900 रुपये प्रतिक्विंटल आहे.
दरम्यान, साखरेच्या किमान विक्री किमतीमध्ये 25 टक्के वाढ करण्याची विनंती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे.महासंघाने मंत्रालयाचे सचिव, संजीव चोप्रा यांना लिहिलेल्या पत्रात, आगामी साखर हंगामासाठी, जो 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, साखरेचा किमान विक्री दर 3,100 रुपये प्रतिक्विंटलवरून 3,900 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
महागाईवर परिणाम नाही
या वाढीमुळे ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही; कारण सध्याचे बाजारभाव या दरांशी आधीच जुळलेले आहेत, असे महासंघाने म्हटले आहे. हा निर्णय सध्याच्या दरांना कायदेशीर आधार देईल आणि उद्योगात स्थिरता आणण्यास मदत करेल. पत्रात असेही नमूद केले आहे की, सध्याच्या बाजारपेठेतील किरकोळ दरांचा महागाई निर्देशांकावर परिणाम होत नाही.
जाहीर केलेला कोटा आणि सणासुदीची परिस्थिती पाहता साखरेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे सध्या असलेल्या दरामध्ये 50 ते 100 रुपये प्रतिक्विंटल वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे साखर उद्योग अभ्यासक पी. जी. मेढे म्हणाले.