धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करणार? अजित पवार व सुनील तटकरे म्हणाले…

धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करणार? अजित पवार व सुनील तटकरे म्हणाले…

 

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. तसेच वाल्मिकबरोबरच्या संबंधांमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, आता धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध लागल्याचं बोललं जात आहे. कारण कर्जतमधील एका कार्यक्रमात मुंडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोरच मोठी मागणी केली आहे. धनंजय मुंडे म्हणाले, “मला रिकामं ठेवू नका. एखादी जबाबदारी द्या.” धनंजय मुंडे यांच्या या मागणीवर आता सुनील तटकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील तटकरे म्हणाले, “ते (धनंजय मुंडे) मला म्हणालेत की काम द्या. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. वेगवेगळे अर्थ घेता येतील. त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. कारण त्यांनी राजीनामा दिला त्याची काही कारणं आहेत. न्यायालयीन प्रक्रिया व चौकशी चालू आहे. त्यासंदर्भात आमचे पक्षश्रेष्ठी, महायुतीचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार एकत्र बसून निर्णय घेतील.”

धनंजय मुंडे काय म्हणाले होते?

“माझी सुनील तटकरे यांना विनंती आहे की त्यांनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. आम्ही चुकलो तर आमचे कान धरावे. चुकलो नाही तर चांगलंच आहे. पण आता रिकामं ठेवू नका. जबाबदाऱ्या द्या एवढीच मी त्यांना विनंती करतो.”

भुजबळांचा मिश्किल टोला

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या मागणीवर त्यांच्या पक्षातील वरिष्ठ सहकारी छगन भुजबळ म्हणाले, “मुंडे यांच्या मागणीचा पक्ष जरूर विचार करेल. तोवर मी एवढंच सांगेन की आपल्याकडे एक काम आहे. बाकीच्या जबाबदाऱ्यांचं अजित पवार पाहतील. परंतु, आपल्याकडे ओबीसी आरक्षणाचं काम आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे ओबीसी आरक्षणाचं काम करत होते, त्यापैकी बरंच काम बाकी आहे. धनंजय मुंडे हे या ओबीसी आरक्षणाच्या लढाईत सहभागी झाले तर बरं होईल. यामुळे गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न देखील पूर्ण होईल.”

दरम्यान, “धनंजय मुंडे यांच्या विनंतीचा विचार केला जाईल”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.